Maharashtra

नक्षलींशी संबंधित अटक केलेल्या कार्यकर्त्यांची शरद पवार घेणार भेट

By PCB Author

August 30, 2018

मुंबई, दि. ३० (पीसीबी) – नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या संशयावरून अटक  केलेल्या कार्यकर्त्यांपैकी काहींना आपण ओळखतो. ते डाव्या विचारांचे असले, तरी त्यांचे नक्षलवाद्यांशी संबंध असल्याचे आणि ते कोणाची हत्या करतील, असे आपल्याला वाटत नाही. त्यांची  अटक दुर्दैवी असून त्यांना व त्यांच्या कुटुंबियांची आपण भेट घेणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी  सांगितले. सनातन संस्थेशी संबंध असलेल्या संशयितांवरून लक्ष वळवण्यासाठी त्यांना अटक केली असावी, असेही पवार यांनी म्हटले आहे.  

पवार पुढे म्हणाले की, सध्या देशात भीतीचे वातावरण आहे. ही परिस्थिती बदलण्याची जबाबदारी विरोधी पक्षांवर आली आहे. देशात भाजपविरोधात सर्व  पक्षांना सोबत घेण्याची गरज आहे. महाराष्ट्रात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र निवडणूक लढविणार आहेत. पुढच्या तीन महिन्यांत जागावाटपाचा निर्णय घेण्यात येईल’, असेही पवार यावेळी  म्हणाले.

दरम्यान, आगामी  लोकसभा निवडणुकांसाठी देशभरातील विविध पक्षांशी चर्चा करण्याचे पवार यांना अधिकार देण्यात आले  आहेत. याबाबतचा ठराव राष्ट्रवादीच्या कार्यकारिणी बैठकीत घेण्यात आला आहे. मी पंतप्रधानपदाचा उमेदवार नाही’, असे पवार यांनी स्पष्ट केले आहे. तर माजी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, माजी पंतप्रधान देवेगौडा आणि सर्व विरोधी पक्षांना एकत्र आणण्यासाठी पवारांनी पुढाकार घ्यावा, असेही मत बैठकीत व्यक्त करण्यात आले आहे.