Desh

नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात बीएसएफचे दोन जवान शहीद; एक जखमी

By PCB Author

July 15, 2018

रायपूर, दि. १५ (पीसीबी) – छत्तीसगडमधील कांकेर जिल्ह्यामध्ये नक्षलवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत बीएसएफचे दोन जवान शहीद झाल्याची माहिती आहे, याशिवाय अन्य एक जवान जखमी आहे. एका वृत्तवाहिनीने याबाबतचे वृत्त दिले आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, पहाटे पावणे चारच्या सुमारास बीएसएफचे जवान प्रतापपूर पोलीस स्थानकाच्या हद्दीत गस्त घालत असताना दबा धरुन बसलेल्या नक्षलवाद्यांनी त्यांच्यावर गोळीबार केला. यामध्ये बीएसएफचे दोन जवान शहीद झाले तर अन्य एक जखमी झाला आहे. जखमी जवानाला हेलिकॉप्टरने रायपूरला आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र खराब वातावरणामुळे हेलिकॉप्टर माघारी बोलवण्यात आले आहे. शहीद जवान बीएसएफच्या १७५ व्या बटालियनचे जवान आहेत. शहीद जवानांचे पार्थिव पंखाजूर येतील बीएसएफच्या मुख्यालयात आणण्यात आले असल्याचे सूत्रांनी सांगितले. यापूर्वी याच महिन्यात कांकेरमध्ये नक्षलवाद्यांनी भूसुरंगाचा स्फोट घडवून आणला होता, त्यामध्ये बीएसएफचे दोन जवान शहीद झाले होते.