नक्षलवादाचे समूळ निर्मूलन करून नक्षलवाद शून्यावर आणणार – एकनाथ शिंदे

0
620

गडचिरोली,दि.२२(पीसीबी) – विकासाच्या माध्यमातून नक्षलवादाचे समूळ निर्मूलन करून तो शून्यावर आणणार तसेच नक्षलवादग्रस्त जिल्हय़ात काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी बदली धोरण बदलणार असल्याचे प्रतिपादन नगरविकास, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत केले.

पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे मंगळवारी येथे आगमन झाल्यानंतर त्यांनी आत्मसमर्पित दोन नक्षल दाम्पत्यांशी संवाद साधला. तसेच शासकीय योजनांचा लाभ मिळत आहे की नाही, याची माहिती जाणून घेतली.जिल्ह्यासाठी मंजूर झालेला कोणताही निधी परत जाणार नाही याची काळजी सर्व विभागांनी घ्यावी. तुमच्या अडचणी सांगा, पदाधिकाऱ्यांना विश्वासात घ्या आणि विकासात्मक कामे मार्गी लावा, अशा सूचनाही त्यांनी विभाग प्रमुखांना यावेळी दिल्या.

जिल्ह्यातील अनेक गावात अजूनही वीज पोहचलेली नाही. त्यासाठी आवश्यक योजना तयार करा, शासनाकडून त्यासाठी विशेष प्रयत्न करू. पुढील जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये वीज प्रश्न सुटलेला असेल, अशी अपेक्षा आहे, असे ते म्हणाले.प्रलंबित राहिलेला विषय, योजनावर झालेला आतापर्यंतचा खर्च, प्रकल्पाची सद्यस्थिती याबाबतची माहिती पालकमंत्री यांनी यंत्रणेकडून प्राप्त केली व आरोग्य, शिक्षण, कौशल्य, रस्ते विकास या विभागाच्या विकासावर भर देण्याबाबतची सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना केली.

जिल्हा वार्षिक योजना २०१८-१९ अंतर्गत माहे मार्च २०१९ अखेर जिल्ह्य़ास प्राप्त निधी पैकी ९९.७९ टक्के निधी खर्च झालेला असल्यामुळे सदर बाब कौतुकास्पद आहे, असे नमूद केले, पंरतु जिल्हा वार्षिक योजना सन २०१९-२० अंतर्गत डिसेंबर अखेर जिल्हय़ात वितरित निधीपैकी ६०.६६ टक्के निधी खर्च झाल्याने जिल्हय़ाच्या दृष्टीने ही अतिशय गंभीर बाब आहे, असे पालकमंत्री शिंदे यांनी मत व्यक्त केले.