नऊ पोलीस उपायुक्तांच्या बदल्या

0
253

मुंबई, दि. ११ (पीसीबी) – बदल्यांवरून राजकारण घडल्यानंतर आठवडय़ाच्या आत पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी शुक्रवारी नऊ उपायुक्तांच्या पुनश्च बदल्या केल्या. ज्या दहा अधिकाऱ्यांच्या अंतर्गत बदल्या राज्य सरकारने रद्द केल्या होत्या त्यातील नऊ जणांचा या नव्या बदली आदेशात समावेश असून सहा जणांच्या बदलीचे ठिकाण ‘जैसे थे‘ ठेवण्यात आले आहे.

वरळी, ताडदेव, ना. म. जोशी मार्ग, आग्रीपाडा आदी महत्वाच्या पोलीस ठाण्यांचा समावेश असणाऱ्या परिमंडळ ३ बाबतचा बदल मात्र नवा आहे. दोन जुलैला उपायुक्त परमजीत दहिया, प्रशांत कदम, गणेश शिंदे, डॉ. रश्मी करंदीकर, शहाजी उमाप, डॉ. मोहन दहिकर, विशाल ठाकू र, संग्रामसिंग निशाणदार, प्रयण अशोक आणि नंदकुमार ठाकूर या १० जणांची अंतर्गत बदली आयुक्त सिंग यांनी केली. मात्र दोन दिवसात राज्य सरकारने आक्षेप घेत या बदल्या तडकाफडकी रद्द केल्या. ५ जुलैला पोलीस आयुक्तालयाच्या प्रशासकीय विभागाने बदल्या रद्द केल्याचे आदेशान्वये जाहीर केले. सिंग यांच्यावतीने प्रशासकीय विभागाने शुक्रवारी उपायुक्त निशाणदार वगळून उर्वरित नऊ जणांच्या बदलीचे नवे आदेश काढले. त्यात उपायुक्त कदम(परिमंडळ ७), शिंदे(बंदर परिमंडळ), डॉ. करंदीकर(सायबर), उमाप(विशेष शाखा १), विशाल ठाकूर(परिमंडळ ११) आणि प्रयण अशोक(परिमंडळ पाच) यांच्या बदल्या आधीच्या आदेशानुसार ‘जैसे थे‘ किंवा त्याच ठिकाणी करण्याचा निर्णय सिंग यांनी घेतला.

मात्र उपायुक्त दहिया यांना परिमंडळ एक ऐवजी तीन, दहिकर यांच्याकडे गुन्हे शाखेऐवजी सशस्त्र विभाग(ताडदेव) आणि नंदकुमार ठाकूर यांच्याकडे मुख्यालय १ ऐवजी गुन्हे शाखेची जबाबदारी सोपवण्यात आली. या यादीतील दहिया यांच्या बदलीबाबत विशेष चर्चा पोलीस दलात सुरू आहे. नरिमन पॉइंट, कफ परेडनंतर कॉपरेरेट कार्यालये फोफावलेला आणि नवश्रीमंतांच्या विरंगुळ्यासाठीच्या सर्व सोयी-सुविधा असलेला लोअर परळ विभाग या परिमंडळात मोडतो. राजकीय आणि सामाजिक दृष्टय़ा सर्वात संदेनशील असलेले वरळीही याच परिमंडळात येते.