धोनी पुन्हा संघात परतणार? बीसीसीआय अध्यक्ष गांगुलीने दिले संकेत

0
761

नवी दिल्ली, दि. २३ (पीसीबी) – भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली याने बुधवारी बीसीसीआय चे अध्यक्षपद स्वीकारले. बीसीसीआय च्या अध्यक्षपदासाठी माजी क्रिकेटपटू ब्रिजेश पटेल आणि सौरव गांगुली या दोघांच्या नावांची चर्चा होती. मात्र १४ ऑक्टोबर रोजी केवळ सौरव गांगुलीनेच अध्यक्षपदासाठी नामांकन अर्ज दाखल केला. त्यामुळे बीसीसीआय च्या अध्यक्षपदी गांगुली विराजमान होणार हे निश्चित झाले होते. त्यानुसार आज सौरव गांगुलीने बीसीसीआय च्या अध्यक्षपदाची सूत्र स्वीकारली.

बीसीसीआय अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर गांगुलीने एका पत्रकार परिषदेत माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याच्या निवृत्तीबद्दल महत्त्वाचे वक्तव्य केले. “धोनीने आपल्या कामगिरीमुळे भारताची मान अभिमानाने उंचावली आहे. जेव्हा तुम्ही शांतपणे बसाल आणि धोनीने केलेल्या विक्रमांची यादी पहाल, तेव्हा तुम्हीच म्हणाल की चॅम्पियन इतक्या लवकर संपत नाहीत. जोवर मी बीसीसीआय चा अध्यक्ष आहे, तोपर्यंत साऱ्यांचा योग्य मान राखला जाईल”, असे गांगुलीने स्पष्ट केले.

दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने नियुक्ती केलेल्या प्रशासकीय समितीचा कार्यकाळ आज संपला. त्यामुळे आजच सौरव गांगुलीच्या नावाची घोषणा करण्यात आली आणि त्याची बिनविरोध नियुक्ती करण्यात आली. त्याच्या अध्यक्षतेखाली बीसीसीआयची पहिली वार्षिक सर्वसाधारण सभाही आजच होणार आहे. गांगुलीसोबतच भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा मुलगा जय शाह याने बीसीसीआय च्या सचिवपदाचा आणि बीसीसीआय चे माजी अध्यक्ष अनुराग ठाकूर यांचा भाऊ अरुण धुमाळ यांनी बीसीसीआय च्या कोषाध्यक्षपदाचा पराभव स्वीकारला. त्यांचीही निवड बिनविरोध झाली.