धोनीने स्थानिक क्रिकेटमध्ये खेळण्याची गरज – सुनील गावसकर

0
450

मुंबई, दि.२९ (पीसीबी) – भारताचे माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी महेंद्रसिंह धोनीला स्थानिक क्रिकेटमध्ये खेळण्याचा सल्ला दिला आहे. भारताच्या अनेक खेळाडूंनी आपला हरवलेला सूर परत मिळवण्यासाठी स्थानिक क्रिकेटमध्ये खेळण्यास पसंती दर्शवली आहे, मात्र धोनीने भारतीय संघाची कमान सांभाळल्यापासून कधीच स्थानिक क्रिकेट खेळलेले नाही. आयपीएलमध्ये धावांचा पाऊस पाडणारा धोनी, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मात्र नेहमी अपयशी ठरताना पहायला मिळतो.

“धोनीला जेव्हा कधी वेळ मिळेल तेव्हा त्याने स्थानिक क्रिकेट खेळण्याची गरज आहे. स्थानिक क्रिकेट स्पर्धेतील ४ दिवसीय सामने खेळण्याचा एक खेळाडू म्हणून तुम्हाला प्रचंड फायदा होतो. याचसोबत झारखंडच्या तरुण खेळाडूंनाही धोनीच्या अनुभवाचा फायदा मिळेल. धोनी हा आताही झारखंडच्या संघाबरोबर मार्गदर्शक म्हणून प्रवास करतो, मात्र त्याचे संघात असणे अनेक खेळाडूंना नवीन उर्जा देऊन जाईल.” गावसकर एका वृत्तसमुहाशी बोलत होते.

यंदाच्या वर्षात धोनीने ९ वन-डे सामन्यांमध्ये २७ च्या सरासरीने फक्त १८९ धावा काढल्या आहेत. या सामन्यांमध्ये धोनीची सर्वोत्तम धावसंख्या आहे ४२. ५० षटकांच्या सामन्यात तुम्हाला मर्यादीत संधी मिळतात, मात्र स्थानिक क्रिकेटमध्ये तुम्ही ४ दिवसांचे सामने खेळलात की तुमचा फलंदाजीवर अधिक हात बसत जातो. मैदानावर उभे राहण्याची क्षमता व अन्या बाबींसाठीही स्थानिक क्रिकेट खेळणे फायदेशीर ठरते, असेही गावसकर म्हणाले. त्यामुळे गावसकरांनी दिलेला सल्ला धोनी ऐकतो का याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.