धुळे महापालिकेवर भाजपची निर्विवाद सत्ता; ५० जागांवर विजय    

0
1261

धुळे, दि. १० (पीसीबी) – धुळे महापालिकेच्या निवडणुकीत ७४ पैकी ५० जागावर विजय मिळवत  भाजपने  स्पष्ट बहुमत मिळवले आहे. भाजपमधून बाहेर पडलेल्या अनिल गोटे यांचा लोकसंग्राम पक्ष, काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी, शिवसेना  यांचा सुफडासाफ झाला. धुळे  महापालिकेच्या निवडणुकांची मतमोजणी आज (सोमवारी) सकाळी १० वाजल्यापासून सुरु होती.

भाजपने ५०, काँग्रेस  ५,  राष्ट्रवादीने ९, जागांवर विजय मिळवला.  तर शिवसेना, समाजवादी पक्ष आणि एमआयएमला प्रत्येकी २ जागांवर समाधान मानावे लागले. लोकसंग्रामला केवळ १ जागेवर विजय मिळवता आला. तर बसप १ जागेवर विजयी झाली. २ जागांवर अपक्ष उमेदवार विजयी झाले आहेत. महापालिकेच्या  निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या उमेदवारांनी चांगली लढत दिली. मात्र,  भाजपने ५० जागांवर निर्विवाद विजय मिळवत त्यांचा दणदणीत पराभव केला.

दरम्यान, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, रोहयो-पर्यटन मंत्री जयकुमार रावल आणि संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे या भाजपच्या तीन मंत्र्यांनी धुळ्यात ठाण मांडला होता. धुळ्यात विजय मिळवण्यासाठी  या मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. अखेर भाजपने या निवडणुकीत निर्विवाद विजय मिळवून महापालिकेवर एकहाती सत्ता आणली आहे.