Maharashtra

धवलसिंह मोहिते पाटील राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर  

By PCB Author

March 22, 2019

मुंबई, दि. २२ (पीसीबी) – माढ्‌याचे विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांचे पूत्र रणजितसिंह मोहिते पाटील यांनी  भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यानंतर आता त्यांचे कट्टर विरोधक असलेले चुलत बंधू आणि शिवसेना नेते धवलसिंह मोहिते पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

धवलसिंह मोहिते पाटील यांनी बुधवारी मुंबई येथे  राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती. त्यानंतर आज (शुक्रवार)  त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांची अकलूज येथे बैठक बोलावली आहे.  तर दुसरीकडे त्यांची पक्ष विरोधी कारवाया केल्याप्रकरणी  शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आल्याचे  सांगितले जात आहे.

दरम्यान, त्यांनी वर्षभरापूर्वीच शिवसेनेचा राजीनामा दिला होता. ते एक-दोन दिवसांत राष्ट्रवादीत प्रवेश करणार  असल्याचे समजते. धवलसिंह  यांनी  अकलूज येथील त्यांच्या प्रतापगड या बंगल्यावर आज कार्यकर्त्यांची बैठक बोलावली आहे. या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे.