धर्मेंद्र कांबळे लिखित ‘पैशाचे रहस्य’ पुस्तकाचे प्रकाशन

0
180

पिंपरी,दि.०४(पीसीबी) – लेखक धर्मेंद्र कांबळे लिखित ‘पैशाचे रहस्य’ या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पुस्तकाचे प्रकाशन वनपाल रमेश जाधव आणि मराठवाडा जनविकास संघाचे अध्यक्ष अरुण पवार यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी बोलताना अरुण पवार यांनी सांगितले, की आज एकविसाव्या शतकात पैशाला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. जगण्यासाठी पैसा लागतो, हा अतिशय महत्त्वाचा विषय असतानाही पैशाविषयी शाळेमध्ये शिकवले जात नाही. लेखकाने पुस्तकात सांगितले आहे, की तो शाळेत हुशार होता. दहावीमध्ये पहिला आला. पण पैश्याचे ज्ञान नव्हते; त्याने कॉम्प्युटर सायन्समध्ये पदवी घेतली होती. जेव्हा तो शहरामध्ये आला तेव्हा त्याला जगण्यासाठी पैसा लागत होता. पण पैसा कसा मिळवावा याचे ज्ञान नव्हते. पैसा मिळवण्यासाठी त्याने वेगवेगळी कामे केली. साफसफाईचे, भांडी घासण्याचे काम केले. श्रीमंत होण्यासाठी खूप अभ्यास व संशोधन केले, अनेक श्रीमंत व्यक्तींचा अभ्यास केला. प्रवासात त्याला अनेक रहस्य व पैसा मिळवण्याचे नियम सापडले. तसेच गरिबीचे रहस्य सापडले. हे सर्व या पुस्तकात मांडले आहे. व्यवस्थापन, विक्री, व्यवसाय, जाहिरात याविषयी सांगितले आहे.

जाधव म्हणाले, की पैशांचे मूलभूत नियम यामध्ये सांगितले आहेत. हे पुस्तक म्हणजे पैशाच्या कोठाराची चावी आहे. तुम्ही जेवढी मोठी समस्या सोडवणार तेवढा तुम्हाला पैसा मिळणार. जर तुम्ही लोकांना काय पाहिजे, ते मिळवून दिले तर तुम्हाला हवे ते मिळेल. लेखक धर्मेंद्र कांबळे म्हणाले, की पुस्तकाला जगभरातून चांगला प्रतिसाद मिळेल, असा विश्वास आहे.