धरण व्यवस्थापनासाठी कर्नाटक आणि महाराष्ट्र सरकार उच्चस्तरीय समिती नियुक्त करणार

0
550

मुंबई, दि. ५ (पीसीबी) – धरण व्यवस्थापनात समन्वयाच्या अभावामुळे महाराष्ट्रातील कोल्हापूर-सांगली भागात भीषण पूर परिस्थिती उद्भवली होती. जीवितहानी तर झालीच पण सुपीक जमीन,पशुधन देखील या पुरात वाहून गेले. या पुरात हजारो कोटींचे नुकसान झाले असून हजारो नागरिकांचे संसार उध्वस्त झाले आहेत. आता महाराष्ट्र सरकारला जाग आली असून वराती मागून घोडे आणण्याची तयारी सुरु केली आहे.

काल कर्नाटकचे मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा यांनी काल मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. धरण व्यवस्थापनासाठी कर्नाटक आणि महाराष्ट्र राज्य सरकार एक उच्चस्तरीय समिती नियुक्त करणार आहे. नुकत्याच उद्भवलेल्या पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घेतला.

कर्नाटकातल्या अलमाटी धरणातून पुरेसा विसर्ग न झाल्याने, कोल्हापूर तसेच सांगली जिल्ह्यात पूर आल्याचा आरोप विरोधी पक्षांकडून केला जात आहे.दरम्यान, कृष्णा पाणी वाटप लवादाच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या, आंध्रप्रदेशच्या पाणी पुनर्वाटपाच्या मागणीचा दोन्ही नेत्यांनी एकमुखाने विरोध केला आहे.