धरणे भरण्यापेक्षा स्वयंपाक केलेला कधीही बरा; उध्दव ठाकरेंचा टोला

0
438

उस्मानाबाद,  दि. १४ (पीसीबी) –  तुम्ही तुमच्या पुतण्याला आवरा. धरणे भरण्यापेक्षा स्वयंपाक केलेला कधीही बरा. जनतेसाठी स्वयंपाक करायचा आहे. पण त्या स्वयंपाकासाठी तुमच्या धरणातील पाणी नको, असा टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना लगावला.

उद्धव ठाकरे यांची सोलापुरातील बार्शीमध्ये प्रचारसभा झाली. या सभेत त्यांनी शरद पवार आणि अजित पवार यांच्यावर निशाणा साधला.

शिवसेनेची झुणका-भाकर योजना कधी बंद झाली ते कळलेच नाही आणि ते आता थाळी देणार आहेत. तुम्हाला राज्य चालवायचे आहे, की स्वयंपाक करायचा आहे, असा टोला शरद पवार यांनी  बार्शी येथील सभेत लगावला होता. यावर ठाकरे यांनी आपल्या ठाकरी शैलीत पवारांना प्रत्युत्तर दिले आहे.

ठाकरे म्हणाले की, अजित पवार यांच्या डोळ्यांमध्ये अश्रू आले. दुष्काळाच्या वेळेला तुमचे अश्रू कुठे होते? दगडाला सुद्धा पाझर फुटतो, असे ऐकले होते. त्यामुळे अजित पवार यांना सुद्धा अश्रू फुटतात,  हे कळल्यावर बरे वाटले, असा टोला त्यांनी लगावला.