धरणग्रस्त वृध्द शेतकऱ्याचा पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात आत्महत्येचा प्रयत्न

0
337

पुणे, दि. १४ (पीसीबी) – एका धरणग्रस्त वृध्द शेतकऱ्याने योग्य न्याय मिळत नसल्याच्या कारणावरुन पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पाचव्या मजल्यावरुन उडी घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने तेथे सुरक्षा जाळी बसवण्यात आल्याने मोठा अनर्थ टळला. ही घटना गुरुवारी (दि.१३) दुपारी दोनच्या सुमारास घडली.

धनाजी गेनबा धुमाळ (वय ७७, रा. सानेवाडी, दौंड) असे या वयोवृद्ध शेतकऱ्याचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, धुमाळ हे दौंड तालुक्यात राहतात.  १९५८ साली धरणाच्या निर्मितीसाठी त्यांची जमीन संपादित करण्यात आली असून, १९६१ साली दौंड तालुक्यातील सोनवडी गावात त्यांचे पुनर्वसन करण्यात आले. मात्र २९ धरणग्रस्तांना निवासासाठी देण्यात आलेले भूखंड आजपर्यंत त्यांच्या नावावर झालेले नाहीत, त्यामुळे धुमाळ अनेक वर्षांपासून यासाठी सतत शासनदरबारी हेलपाटे मारत होते. यामुळे कंटाळलेल्या धुमाळ यांनी गुरुवारी दुपारी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पाचव्या मजल्यावरुन उडी घेण्याचा प्रयत्न केला. या वेळी जिल्हाधिकारी कार्यालयात उपस्थित असलेल्या कर्मचार्‍यांनी वेळीच प्रसंगावधान दाखविल्यामुळे मोठा अनर्थ टळला. घटनेची माहिती मिळताच बंडगार्डन पोलिसांनी तत्काळ घटनास्थळाकडे धाव घेतली. याप्रकरणी धुमाळ विरुद्ध बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.