Pimpri

धन्वंतरी योजनेत राष्ट्रवादीच्या लोकांचे लागेबंधे, गैरव्यवहार असल्याचे निदर्शनास आले – कर्मचाऱ्यांना विमा योजना नको अएसल्यास भाजपाचीही आग्रह नाही – सत्ताधारी नेते नामदेव ढाके यांनी दिले स्पष्टीकरण

By PCB Author

June 02, 2020

पिंपरी, दि. २ (पीसीबी) – धन्वंतरी योजनेमध्ये राष्ट्रवादीच्या काही लोकांचे लागेबांधे असल्यामुळे त्यांचे मार्फत गैरव्यवहार होत असल्याचे निदर्शनास आले आहे, असा गंभीर आरोप महापालिकेतील सत्ताधारी नेते नामदेव ढाके यांनी केला आहे. त्यासंदर्भात त्यांनी एक प्रसिध्दीपत्र काढले आहे.

महापालिका सर्वसाधारण सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नगरसेवक योगेश बहल यांनी धन्वंतरी योजना रद्द करून विमा योजना आणण्यामागे मोठा गैरव्यवहार असल्याचा आरोप केली होता. सात कोटी रुपये घेतल्याचा थेट आरोप त्यांनी भाजपाच्या एका माजी पदाधिकाऱ्यावर केला होता. त्याबाबत ढाके यांनी पत्रकात खलासा केला आहे.

पत्रात म्हटले आहे की, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वर्ग १ ते ४ मधील सेवेतील व सेवानिवृत अधिकारी/कर्मचाऱ्यांना दि. ०१/०९/२०१५ पासुन धन्वंतरी स्वास्थ योजना सुरु करणेत आलेली आहे. या योजनेच्या माध्यमातुन महापालिकेचा वर्षाकाठी जवळपास ३० ते ४० कोटी रुपये खर्च होतो. तसेच या योजनेमध्ये राष्ट्रवादीच्या काही लोकांचे लागेबांधे असल्यामुळे त्यांचे मार्फत गैरव्यवहार होत असल्याचे निदर्शनास आले आहे. मुळात धन्वंतरी स्वास्थ योजने ऐवजी विमा योजना लागु करण्याची योजना ही महापालिका आयुक्तांनी पुर्वीच महासभेपुढे आणलेली आहे. याबाबत महापालिका सभा ठराव क्र. ३८८ दि. २२/०२/२०१९ अन्वये विमा योजना लागु करण्यास मान्यता देखील देण्यात आली आहे. आयुक्तांना सुध्दा पुर्वीच्या धन्वंतरी योजनेतील होणारा खर्च आणि त्यामध्ये वारंवार होणारे गैरप्रकार लक्षात आल्यामुळे मनपा हित असलेली आणि कर्मचाऱ्यांना सोयीची ठरणारी विमा योजना आयुक्तांनी सभेपुढे आणली आहे. वास्तविक कालच्या (दि. १) महासभेसमोर विमा योजनेसाठी ५ कोटी रुपये वर्गीकरण करणेस मान्यतेसाठी हा विषय आला होता.सदरचा विषय स्थायी समितीमध्ये मंजुरीसाठी ठेवण्यात आला होता.परंतु कलाटेबंधू स्थायी समती सदस्य असताना सुद्धा त्यांनी ह्या विषयाला विरोध केल्याचे दिसून येत नाही. परंतु राष्ट्रवादीच्या काही मंडळी धन्वंतरी योजनेतुन गैरव्यवहार करुन पैसे कमावण्याचा धंदा करीत होते, अशी चर्चा आहे. त्यांचा धंदा ह्या विमा योजनेमुळे बंद होत असल्याने त्यांचा पोटशूळ उठला आहे. म्हणूनच ते सत्ताधारी मंडळीवर बेछुट आरोप करीत आहेत, असे ढाके यांनी स्पष्ट केले.

मुळातच वायसीएम हॉस्पिटलवर मनपाकडुन दरवर्षी जवळपास २०० कोटी रुपये खर्च केले जातात. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सुविधा देखिल उपलब्ध आहेत. धन्वंतरीची योजना किंवा विमा योजना या दोन्ही योजना सुरु न ठेवता आपल्या वायसीएम हॉस्पिटलमध्येच अधिकारी/कर्मचाऱ्यांना स्वतंत्र सुविधा उपलब्ध करुन द्यावी, अशी आमची भुमिका आहे. प्रशासनाने आणलेल्या इन्शुरन्स योजना कर्मचाऱ्यांना नको असेल किंवा सदर योजनेमध्ये काही गैरप्रकार झाला असल्याचे कर्मचाऱ्यांना वाटत असेल तर भारतीय जनता पार्टीच्या वतीने सदर योजनेचे फेर टेंडर करण्याबाबतही संमती आहे किंवा सदर विमा योजना संपूर्णता रद्द करण्याबाबत आयुक्तांची तयारी असेल तरीही ही आमची कोणतीही हरकत नाही. “चुकीच्या धोरणाला विरोध करण्यासाठी आम्ही कोणाचीही फिकीर करणार नाही” असेही सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी स्पष्ट केले.