धनादेश न वटल्याप्रकरणी डिसेंबरपर्यंत आरोपपत्र; धनंजय मुंडेंना दणका  

0
547

औरंगाबाद, दि. २२ (पीसीबी) – जगमित्र साखर कारखान्यास दिलेल्या जमिनीचा मोबदला म्हणून दिलेला ४० लाख रूपयांचा धनादेश न वटल्याप्रकरणी विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडेंविरोधात डिसेंबरपर्यंत दोषारोपपत्र दाखल करण्यात येईल, अशी माहिती  राज्य सरकारने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठासमोर  दिली आहे. त्यामुळे मुंडे  अडचणीत येण्याची शक्यता आहे. 

अंबाजोगाई तालुक्यातील पुस (जि. बीड) येथील गीते यांची जमीन ५० लाख रुपयांत घेण्यात आली होती. त्यानंतर परळीच्या बॅंक ऑफ महाराष्ट्रचा  धनंजय मुंडे यांनी ४० लाख रूपयांचा धनादेश  गीते यांना दिला. दरम्यान धनादेश न वटताच परत आला आणि तीन वर्षे पाठपुरावा करूनही रक्कम मिळाली नाही.  त्यानंतर  गीते यांनी पोलिसांमध्ये  तक्रार दाखल  केली.

या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला नव्हता. याविरोधात अॅड. व्ही. डी. गुणाले यांच्यावतीने गीते यांनी खंडपीठात धाव घेतली. त्यानंतर  खंडपीठाने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले.  गीते यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भारतीय दंड विधानातील ४२० (फसवणूक) व ३४ नुसार बर्दापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.