धनगर आरक्षणाचा कृती अहवाल पुढील अधिवेशनात मांडणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
576

मुंबई, दि. ३० (पीसीबी) – महाराष्ट्रातील धनगर समाजाला आदिवासींचे आरक्षण देण्याबाबत टाटा समाज विज्ञान संस्थेचा सर्वेक्षण अहवाल सरकारला मिळाला आहे. त्यावर कार्यवाही अहवाल (अॅक्शन टेकन रिपोर्ट) पुढील अधिवेशनात सभागृहात मांडण्याचे स्पष्ट आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत दिले. तसेच आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी धनगर समाजाला अपेक्षित असलेल्या आरक्षणाबाबतची शिफारस केंद्र सरकारकडे केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

धनगर आरक्षणाबाबत काँग्रेसचे आमदार शरद रणपिसे यांनी तारांकित प्रश्न विचारला होता. त्याला उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “धनगर समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश करण्यासंदर्भात टाटा समाज विज्ञान संस्थेला सर्वेक्षणाचे काम देण्यात आले होते. या संस्थेचा सर्वेक्षण अहवाल सरकारला प्राप्त झाला आहे. त्यावर सरकारचा कार्यवाही अहवाल पुढच्या अधिवेशनात सभागृहात मांडण्यात येईल.

केंद्र सरकारकडे शिफारस करताना त्यांच्या समर्थनार्थ काही घटनात्मक बाबींची आवश्यकता असते. मंत्रिमंडळ उपसमिती त्यावर विचार करत आहे. धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण देताना सध्या अस्तित्वात असलेल्या आदिवासी प्रवर्गाच्या आरक्षणाला जराही धक्का लागणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली. राज्याच्या काही भागात धनगर समाजाची स्थिती आदिवासीपेक्षाही हलाखीची असल्याचे टाटा समाज विज्ञान संस्थेचा अहवाल सांगतो, असेही त्यांनी सांगितले.