“धनंजय मुंडे यांच्या विरोधात भाजपा महिलाचा मोर्चा रस्त्यावर उतरणार”

0
242

– भाजपा महिलाचा मोर्चा प्रदेशाध्यक्ष उमा खापरे यांचा इशारा

– सोमवारपासून प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हाधिकारी, तहसीलदारांना देणार निवेदन

पिंपरी, दि. 16 (पीसीबी) : गेल्या अनेक दिवसांपासून महाविकास आघाडी सरकारचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांचा विषय चर्चेला येत आहे. महिलेने केलेल्या आरोपानंतर जबाबदार व्यक्ती म्हणून त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा देणे गरजेचे होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील त्यांचा राजीनामा घेतला नाही. त्यामुळे त्यांचा राजीनामा घ्यावा, या मागणीसाठी भाजप महिला मोर्चाच्या राज्यभर आंदोलन छेडण्यात येणार असल्याची माहिती प्रदेशाध्यक्षा उमा खापरे यांनी सोशल मीडियाद्वारे दिली. प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हाधिकारी, तहसीलदारांना देखील निवेदन देणार असल्याचे उमा खापरे यांनी सांगितले.

उमा खापरे म्हणाल्या कि, महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळातील सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्याविरोधात मुंबई पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. रेणु शर्मा नावाच्या तरुणीने ब्लकमेल करून अनैसर्गिक कृत्य व अत्याचार केल्याची तक्रार दाखल केली आहे. मंत्री मुंडे यांनीही सोशल मिडीयावर कबुली दिली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून हा विषय राज्यभरात चर्चेचा झाला आहे. त्यानुसार मंत्री मुंडे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी भाजपा महिला मोर्चाच्या वतीने करण्यात आली होती. मात्र त्यांनी राजीनामा दिला नाही. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील त्यांचा राजीनामा घेतला नाही. माजी कृषिमंत्री व राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार हे सातत्याने महिला धोरणाविषयी आग्रही भूमिका मांडतात. मात्र त्यांनीही मुंडे यांचा राजीनामा घेतला नाही.

त्यामुळे येत्या सोमवारपासून भाजपा महिला मोर्च्याकडून प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हाधिकारी, तहसीलदारांना निवेदन देण्यात येणार आहे. तसेच रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करून मुंडे यांना मंत्री पदावर का ठेवले या बाबत जाब विचारणार असल्याचा इशारा भाजप महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा उमा खापरे दिला.