धनंजय मुंडेंचा कट्टर समर्थक असलेल्या माजी नगरसेवकाचा तलवारीने वार करुन निर्घुण खून

0
461

परळी, दि. २५ (पीसीबी) – विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांचे कट्टर समर्थक माजी नगरसेवक पांडुरंग गायकवाड (वय ४६, रा. भीमवाडी, परळी) यांचा अज्ञात टोळक्यांनी तलवारीने वार करुन  निर्घुण खून केला. ही घटना रविवारी (दि.२४) रात्री उशीरा परळी येथील उड्डाणपुलाखाली घडली. या धक्कादायक घटनेमुळे परळी शहर परिसरात तणावाचे वातावरण आहे. तर  पूर्ववैमनस्यावरुन ही हत्या घडवून आणली असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गौतमनगर भागात पांडुरंग गायकवाड यांचे खुप काम होते. सध्या येथील उड्डाण पुलाखालील लोकांना टँकरने पाणीपुरवठा सुरु होता. रविवारी मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास येथे पाण्याचा टँकर आला होता. त्यामुळे पांडुरंग गायकवाड हे त्या ठिकाणी आले. त्यावेळी काही जणांनी पूर्व वैमनस्यावरुन त्यांच्यावर तलवारीने सपासप वार करुन त्यांचा खून केला. ही घटना वाऱ्यासारखी परळी शहरात पसरली तर पोलीस अधिकारी, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, कार्यकर्ते यांची घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती. अंबाजोगाई चे अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक अजित बोऱ्हाडे यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. मारेकऱ्यांचा शोध घेण्यास सुरुवात झाली असून याप्रकरणी पोलिसांनी काही जणांना ताब्यात देखील घेतले आहे. मात्र, गायकवाड यांची हत्या कोणी आणि का केली हे अद्याप समजु शकले नाही. परळी पोलीस तपास करत आहेत.

दरम्यान या घटनेला राजकीय वळण मिळण्याची शक्यता आहे. पांडुरंग गायकवाड यांच्या पत्नी मीनाबाई गायकवाड या देखील राष्ट्रवादीच्या विद्यमान नगरसेविका आहेत. तर गायकवाड हे परळी नगरपरिषदेचे माजी नगरसेवक होते.