धनंजय, पंकजा मुंडेंची एकाच व्यासपीठावर टोलेबाजी   

0
842

बीड, दि. ११ (पीसीबी) –  ‘मी वेळेवर येणारी विद्यार्थिनी आहे’, असा टोला पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांना लगावला. यावर ‘चांगले विद्यार्थी लवकर येतात आणि वेळेआधीच जातात, हे मला पहिल्यांदाच समजले, असा प्रतिटोला धनंजय यांनी पंकजा यांना लगावला. दोघांच्या या टोलेबाजीमुळे उपस्थितांची मात्र, चांगलीच करमणूक झाली.

बीडमधील एका कार्यक्रमात ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आज (सोमवार) एकाच व्यासपीठावर आले होते. यावेळी पंकजा मुंडेंनी वक्तशीरपणावरुन बंधू धनंजय यांना टोला लगावला, तर धनंजय मुंडेंनीही बहिणीला प्रत्युत्तर दिले.

या कार्यक्रमाला धनंजय मुंडे उशिरा आल्याचा धागा पकडत ‘मी वेळेवर येणारी विद्यार्थिनी आहे’ असा टोला पंकजा यांनी  लगावला. मी वेळेत आले, मात्र कार्यक्रम उशिरा सुरु झाला. दुसऱ्या कार्यक्रमाला जाणे गरजेचे आहे, त्यासाठी मी दिलगिरी व्यक्त करते’ असे म्हणत कार्यक्रम संपण्याच्या आधीच पंकजा निघून गेल्या.

यावर धनंजय मुंडेंनीही टोला लगावला. चांगले विद्यार्थी लवकर येतात आणि वेळेआधीच जातात, हे मला पहिल्यांदाच समजले. शेवटी, मार्कशीटवर कोण विद्यार्थी चांगला, कोण वाईट हे ठरते. मात्र वेळेला आम्ही कायम सोबत असतो, हे निश्चित’ असे प्रत्युत्तर धनंजय मुंडेंनी दिले.