धडक मोहिमेत लाखांवर थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित

0
415

– आर्थिक अडचणीमुळे महावितरणकडून कटू कारवाई सुरु
– तब्बल २२.४६ लाख ग्राहकांकडे २५०३ कोटींची थकबाकी
– शेजाऱ्यांकडून वीजपुरवठा घेतल्यास थेट फौजदारी कारवाई

पुणे, दि. २३ (पीसीबी) : पश्चिम महाराष्ट्रातील २२ लाख ४६ हजार अकृषक वीजग्राहकांकडे वीजबिलांची थकबाकी तब्बल २५०३ कोटी १७ लाखांवर गेली आहे. त्यामुळे आर्थिक अडचणीत असलेल्या महावितरणकडून नाईलाजाने गेल्या पंधरवड्यात १ लाख ३ हजार थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे.

सद्यस्थितीत पश्चिम महाराष्ट्रात घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक, पथदिवे, सार्वजनिक पाणीपुरवठा इतर अकृषक वर्गवारीतील २२ लाख ४५ हजार ९०० ग्राहकांकडे २५०३ कोटी १७ लाख रुपयांची थकबाकी आहे. यामध्ये (कंसात थकबाकी) पुणे जिल्हा- १० लाख ३६ हजार ६०० (१०४५ कोटी), सातारा जिल्हा- २ लाख २२ हजार ६०० (२६२ कोटी), सोलापूर जिल्हा- ३ लाख ३६ हजार ९०० (६६५ कोटी), सांगली जिल्हा- २ लाख ७६ हजार ९५० (२२६ कोटी) आणि कोल्हापूर जिल्ह्यात ३ लाख ७२ हजार ७६० ग्राहकांकडे ३०५ कोटी रुपयांची थकबाकी आहे.

वारंवार आवाहन व विनंती करून देखील भरणा होत नसल्याने वाढत्या थकबाकीमुळे महावितरणची आर्थिक घडी विस्कटली आहे व अन्य कोणताही पर्याय नसल्याने थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याची धडक मोहीम आणखी तीव्र करण्यात आली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात ६० हजार २६०, सातारा जिल्हा- ४७९०, सोलापूर- ९६३१, कोल्हापूर- १९ हजार ५२८ आणि सांगली जिल्ह्यातील ९३१३ थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे.

वीजपुरवठा खंडित केल्यावरही वीज वापरल्यास फौजदारी – या धडक मोहिमेत थकबाकीमुळे वीजपुरवठा खंडित केल्यानंतर संबंधीत वीजजोडण्यांची स्वतंत्र पथकांद्वारे पडताळणी सुरु आहे. तसेच या वीजजोडण्यांची सायंकाळनंतर देखील विशेष तपासणी करण्यात येत आहे. या दोहोंमध्ये शेजाऱ्यांकडून किंवा इतर ठिकाणाहून वायर किंवा केबलद्वारे विजेचा वापर आढळल्यास शेजारी व वीज वापरणाऱ्या व्यक्तींविरुद्ध भारतीय विद्युत कायदा २००३ च्या कलम १३५/१३८ नुसार फौजदारी कारवाई करण्यात येत आहे. दरम्यान सार्वजनिक सुटीच्या दिवशी थकबाकी व चालू वीजबिलांचा भरणा करणे सोयीचे व्हावे यासाठी पश्चिम महाराष्ट्रातील महावितरणचे सर्व अधिकृत वीजबिल भरणा केंद्र शनिवारी (दि. २५) व रविवारी (दि. २६) कार्यालयीन वेळेत सुरु राहणार आहेत.

विशेष म्हणजे एका महिन्याचे वीजबिल थकीत असले तरी बिलाची रक्कम किती आहे हे न पाहता नियमानुसार वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई सुरु आहे. त्यामुळे थकबाकी तसेच चालू वीजबिलांचा नियमित भरणा करून सहकार्य करावे असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे. घरबसल्या वीजबिल भरण्यासाठी लघुदाब वर्गवारीतील सर्व वीजग्राहकांना www.mahadiscom.in वेबसाईट व मोबाईल अॅपद्वारे ‘ऑनलाईन’ सोय उपलब्ध आहे. लघुदाब वर्गवारीतील औद्योगिक, वाणिज्यिक व घरगुती ग्राहकांचे वीजबिल १० हजार रुपयांपेक्षा अधिक असल्यास त्यांना ‘आरटीजीएस’ किंवा ‘एनईएफटी’द्वारे थेट वीजबिल भरण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे.