Chinchwad

धक्कादायक : हिंजवडीत १२ वर्षांच्या दोन मुलींवर लैंगिक अत्याचार; एकीचा मृत्यू

By PCB Author

September 20, 2018

चिंचवड, दि. २० (पीसीबी) – हिंजवडी पोलिस ठाणे हद्दीत  १२ वर्षीय दोन अल्पवयीन मुलींवर दोघा नराधमांनी लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. धक्कादायक म्हणजे या घटनेमधील एका मुलीचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. ही घटना रविवारी (दि.१६) दुपारच्या सुमारास हिंजवडीतील एका मंदिराच्या मागच्या बाजूस घडली होती.

हिंजवडी पोलिसांनी याप्रकरणी गणेश निकम या तरुणाला अटक केली असून त्याच्या एका अल्पवयीन साथीदाराला देखील ताब्यात घेण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी दुपारच्या सुमारास दोन्ही बारा वर्षीय अल्पवयीन मुली हिंजवडी येथील एका मंदिरात देव दर्शनासाठी गेल्या होत्या. त्यावेळी तेथे आरोपी गणेश आणि त्याचा अल्पवयीन साथीदार उभे होते. त्यांनी त्या दोघींना चॉकलेट देण्याच्या बहाण्याने मंदिराजवळच असलेल्या एका झुडपात नेले. तसेच त्यांना धमकावून त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केला. यातील एका मुलीवर दोघांनी आळीपाळीने अत्याचार केला. तसेच आरोपींनी घटनेबाबत कुणाला काही सांगितल्या जीवेठार मारण्याची धमकी देऊन मुलींना सोडून दिले. मात्र त्यातील एका मुलीला त्रास होऊन लागल्याने तिच्या आई-वडिलांनी तिला रुग्णालयात दाखल केले. बुधवारी (दि.१९) तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचे समोर आले. यावर पालकांनी तातडीने हिंजवडी पोलिस ठाणे गाठले. पोलिसांनी दुसऱ्या मुलीला विश्वासात घेऊन विचारणा केली असता मुलीने घडलेल्या घटनेबाबत पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी गणेश आणि त्याच्या अल्पवयीन साथीदाराला अटक केली आहे. हिंजवडी पोलिस अधिक तपास करत आहेत.