Chinchwad

धक्कादायक : हिंजवडीत गजबजलेल्या रस्त्यावरुन तरुणीचे अपहरण करुन कारमध्ये बलात्कार करण्याचा प्रयत्न

By PCB Author

October 26, 2018

चिंचवड, दि. २६ (पीसीबी) –  फोनवर बोलत उभ्या असलेल्या एका तरुणीला कारमधून आलेल्या चौघा अज्ञातांनी कारमध्ये जबरदस्तीने बसून तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना हिंजवडीतील शिवाजी चौक येथे गुरुवारी (दि.२५) रात्री नऊच्या सुमारास घडली.

याप्रकरणी पीडित २२ वर्षीय तरुणीने हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी त्यानुसार चार अनोळखी आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित २२ वर्षीय तरुणी ही मूळची गोव्याची आहे. ती हिंजवडी येथील एका इव्हेन्ट मॅनजमेंट कंपनीमध्ये काम करते. गुरुवारी रात्री ती फोनवर बोलत हिंजवडीतील शिवाजी चौकात येथे उभी होती. इतक्या एका कारमधून आलेल्या चौघाजणांनी तिला जबरदस्ती कारमध्ये खेचून घेतले. आणि चालू कारमध्येच तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. मात्र तरुणीने त्या नराधमांचा विरोध करुन आरडाओरड सुरु केली. यामुळे घाबरलेल्या नराधमांनी तिला डांगे चौकात सोडून दिले. यानंतर घाबरलेल्या अवस्थेत स्वत:ला सावरत पीडित तरुणीने हिंजवडी पोलीसात धाव घेऊन तक्रार दाखल केली. पोलीसांनी त्यानुसार अज्ञात चौघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. हिंजवडी पोलिस सीसीटीव्ही आणि तरुणीने सांगितलेल्या वर्णनाच्या आधारे आरोपीचा शोध घेत आहेत.