Maharashtra

धक्कादायक: स्ट्रेचर न मिळाल्याने महिलेची लिफ्टजवळच प्रसूती; बाळ फरशीवर पडल्याने मृत्यू

By PCB Author

January 23, 2019

औरंगाबाद, दि. २३ (पीसीबी) – स्ट्रेचर न मिळाल्याने औरंगाबादमधील घाटी रुग्णालयात एका महिलेची लिफ्टजवळच प्रसूती झाली आणि नवजात बालक फरशीवर पडून त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना मंगळवार (दि.२२) संध्याकाळच्या सुमारास घडली.

प्राप्त माहितीनुसार, औरंगाबादमधील एका महिलेला मंगळवारी संध्याकाळी प्रसूतीकळा सुरु झाल्या. त्यामुळे कुटुंबीयांनी तिला आधी एका खासगी रुग्णालयात नेले. मात्र, तिथे गेल्यावर कळा थांबल्याने महिलेला पुन्हा घरी पाठवण्यात आले. रात्री उशिरा महिलेला पुन्हा प्रसूतीकळा सुरु झाल्या. कुटुंबीय तिला घेऊन पुन्हा रुग्णालयाच्या दिशेने निघाले. घाटी रुग्णालय येईपर्यंत महिलेला प्रसूतीकळा असह्य झाल्या. शेवटी तिला घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. घाटी रुग्णालयात स्ट्रेचर नव्हते. त्यामुळे महिलेला चालतच लिफ्टपर्यंत जावे लागले. लिफ्टजवळच महिलेला प्रसूती झाली आणि नवजात बालक जमिनीवर पडले. यात त्या बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेने महिलेच्या कुटुंबीयांनी संताप व्यक्त केला आहे.