धक्कादायक: सिंहगड येथे कारला नंबर प्लेट नसल्याचा जाब विचारल्याने पोलिसाचे अपहरण करुन मारहाण

438

पुणे, दि. १५ (पीसीबी) – कारला नंबर प्लेट नसल्याचा जाब विचारल्याने एका पोलिस कर्मचाऱ्याचे अपहरण करण्यात आले. तसेच चालत्या कारमध्ये मारहाण करुन काही अंतरावर सोडून दिले. ही घटना रविवारी (दि.१४) रात्री पावणे नऊच्या सुमारास सिंहगड रोड परिसरात घडली.

याप्रकरणी पोलिस कर्मचारी सचिन सर्जेराव तनपुरे (वय ३५, रा. सिंहगड रस्ता) यांनी सिंहगड रोड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, सचिन रानवडे, मयुर मते आणि त्यांचा एकसाथीदारा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तनपुरे हे सिंहगड पोलिस ठाण्यात पोलिस कर्मचारी म्हणून कार्यरत आहेत. रविवारी रात्री साडे आठच्या सुमारास तनपुरे आणि त्यांचा सहकारी शिंदे असे दोन्ही बीट मार्शल रात्रगस्तीवर होते. त्यावेळी सिंहगड रस्त्यावरील हॉटेल निखारासमोर पाठीमागे नंबर प्लेट नसलेल्या कारबाबत तनपुरे व त्यांच्या सहकाऱ्यास संशय आला. कारचा दरवाजा उघडल्यानंतर रानवडे, मते व त्यांच्या एक साथीदार असे तिघेजण मद्यपान करत असल्याचे निदर्शनास आले. तनपुरे यांनी त्यांची चौकशी करण्यास सुरूवात केली. त्यावेळी रानवडेने तनपुरे यांना शिवीगाळ केली, तर शिंदे यांना धक्काबुक्की करीत सरकारी कामात अडथळा आणला.

त्यामुळे तनुपरे यांनी त्यांच्या कारमध्ये बसून त्यांना अभिरुची पोलिस चौकीमध्ये गाडी नेण्यास सांगितले. त्यावेळी कार चालविणाऱ्या रानवडेने कार अभिरुची पोलिस चौकीकडे न घेता प्रयेजा सिटीकडून मुंबई-बंगळुरू महामार्गावर कार घेतली. त्यानंतर फिर्यादी तनपुरे यांना शिवीगाळ व मारहाण करुन उड्डाणपुलावरुन खाली टाकून देण्याची धमकी दिली. रानवडे याने फिर्यादीकडील वॉकीटॉकी व मोबाईल काढून घेतला. त्याचवेळी मते याने रानवडे फिर्यादीस शिवीगाळ, मारहाण करीत असताना मोबाईलवर व्हिडीओ चित्रीकरण करण्यास सुरूवात केली. त्यानंतर फिर्यादी यांना जबरदस्तीने बावधन येथे नेऊन रस्त्यावर सोडून देत पलायन केले. पोलिस निरीक्षक दुर्योधन पवार तपास करत आहेत.