व्हेनेझुएलातील व्हॅलेंसिया येथील एका तुरुंगात भडकलेला हिंसाचार आणि फायरिंगच्या घटनांमध्ये दोन महिलांसह किमान ६८ लोकांचा मृत्यू झाला आहे.

प्राप्त माहितीनुसार, तुरुंगात काही कैद्यांमध्ये आपसात वाद झाला. या वादाचे रुपांतर धक्काबुक्की आणि नंतर हिंसाचारात झाले. काही कैद्यांनी तुरुंग तोडून पळ काढण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी या कैद्यांना इशारा दिला तरीही कोणीही पळ काढायचे थांबले नाही त्यानंतर पोलिसांनी गोळीबार केला ज्यामुळे चेंगराचेंगरीही झाली. या सगळ्या घटनेत ६८ कैद्यांचा मृत्यू झाला आहे यामध्ये दोन महिलांचा समावेश आहे.

घटनेनंतर कैद्यांचे नातेवाईक तुरुंगाबाहेर जमा झाले आणि गोंधळ घालायला सुरुवात केली. तुरुंगाच्या क्षमतेपेक्षा जास्त कैदी होते त्यामुळे वाद भडकला असावा असा आरोप कैद्यांच्या नातेवाईकांनी केला आहे. या सगळ्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी चार सदस्यीय समिती नेमण्यात आली आहे अशी माहिती अॅटॉर्नी जनगरल तारीक साब यांनी दिली आहे.