Maharashtra

धक्कादायक: विरह सहन न झाल्याने प्रेमीयुगुलाची गळफास घेत आत्महत्या

By PCB Author

July 15, 2019

चंद्रपूर, दि. १५ (पीसीबी) – विरह सहन न झाल्याने विवाहित महिलेने प्रियकरासह गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना रविवारी (दि.१४) चंद्रपूर-घुग्घुस राज्य महामार्गावरील शेणगाव येथून काही अंतरावर असलेल्या मत्ते यांच्या शेतात घडली.

सुनिता निळे आणि राजेश गेडाम असे आत्महत्या केलेल्या प्रेमीयुगुलाची नावे आहेत. याप्रकरणी घुग्घुस पोलिसांचा तपास सुरू असून, दोघांचेही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुनिता निळे हिचे नकोडा येथील अमित निळे यांच्याशी लग्न झाले होते. त्यांना ६ वर्षांचा मुलगा आहे. मात्र, सुनीता ही नागपूर येथील राजेश गेडाम यांच्या प्रेमात होती. राजेशचेही लग्न झाले होते. मात्र, त्यांना एकमेकांचा विरह असहनीय झाला होता. रविवारी राजेश हा नागपूरहून सुनीताला भेटायला चंद्रपूरला आला. दोघांनीही एकमेकांची भेट घेतली आणि आत्महत्येचा निर्णय घेतला. चंद्रपूर-घुग्घुस राज्य महामार्गावरील शेणगाव येथून काही अंतरावर असलेल्या मत्ते यांच्या शेतातील कडुलिंबाच्या झाडाला या दोघांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. आज (सोमवार) सकाळी ही घटना समोर आली. घुग्घुस पोलिस तपास करत आहेत.