धक्कादायक ! विम्याच्या रकमेसाठी दत्तक घेतलेल्या मुलाची हत्या

0
270

ब्रिटन, दि.२ (पीसीबी) : ब्रिटनमधील एका जोडप्याने हिंदुस्थानातील एका मुलाला दत्तक घेतले होते. त्यानंतर विम्याची सुमारे दीड कोटींची रक्कम मिळवण्यासाठी त्यांनी त्या मुलाची सुपारी देत हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मात्र, या जोडप्याची कायद्याच्या कचाट्यातून सुटका झाली आहे. आता ते जोडपे ब्रिटनमध्ये खुलेआम फिरत आहे. त्यांच्या प्रत्यार्पणासाठी हिंदुस्थान सरकारने प्रयत्न केले होते. मात्र, युरोपमधील मानवाधिकार कायद्यानुसार त्यांचे प्रत्यार्पण होऊ शकले नाही. ‘डेली मेल’ने याबाबतचे वृत्त दिले आहे.

आरती धीर (वय 55) आणि त्यांचे पती कवल रायजादा (वय 31) हे दोघे ब्रिटनच्या हिथ्रो एअरपोर्टचे माजी कर्मचारी आहेत. त्यांनी 2015 मध्ये गुजरातच्या मलिया हटिना गावातील अनाथ मुलगा गोपाल सेजानी (वय 11) याला दत्तक घेतले होते. दत्तक घेण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर काही दिवसांनी जोडप्याने मुलासाठी ‘वेल्थ बिल्डर’ विमा पॉलिसी घेतली. दत्तक घेतलेल्या मुलगा दोन वर्षांनी 2017 मध्ये राजकोटमध्ये नातेवाईकांकडे आला होता. तेथून परतताना गोपाळ आणि त्याचे नातेवाईक यांच्यावर चाकूने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात गोपाळ आणि त्याचे नातेवाईक हरसुखभाई कारदानी यांचा मृत्यू झाला. गोपाळ आणि त्याच्या नातेवाईकांची हत्या करण्यासाठी या जोडप्याने आपल्याला पैसे दिले होते, असे या जोडप्यासह फ्लॅटमध्ये राहणाऱ्या नीतीश मुंद याने सांगितले.

या घटनेनंतर नीतीश मुंदला अटक करण्यात आली असून तो सध्या तुरुंगात आहे. ब्रिटनच्या न्यायालयात याप्रकरणी सुनावणी झाली. त्यावेळी मुख्य न्यायदंडाधिकारी एम्मा अर्बुथनॉट यांनी याबाबतचा निकाल दिला होता. या जोडप्याविरोधात परिस्थितीजन्य पुरावे सबळ असल्याचे त्यांनी निकालात स्पष्ट केले होते. या जोडप्याने काही लोकांना हाताशी धरून हे कृत्य केल्याचे दिसून येत असल्याचे त्यांनी नमूद केले होते. त्यांनी मुलाच्या नावे काढलेल्या विम्याचे पैसे मिळवण्यासाठीच हे कृत्य केल्याचे दिसून येत असल्याचे निकालात म्हटले होते. ब्रिटनमधील खासदार टिम लूघटन यांनीही या जोडप्याबाबत प्रश्न उपस्थित केले होते. एका मुलाच्या हत्येतील दोषी ब्रिटनच्या रस्त्यांवर खुलेआम कसे फिरू शकतात, असा सवाल त्यांनी केला होता. दरम्यान, आपल्यावर करण्यात येत असलेले आरोप बिनबुडाचे असल्याचे या जोडप्याने म्हटले आहे. या हत्येशी आपला संबंध नसल्याचे सांगत त्यांनी आरोप फेटाळले आहेत.