Maharashtra

धक्कादायक: वर्धामध्ये मंदिरात चोरी केल्याच्या संशयातून चिमुकल्याचा पार्श्वभाग जाळला

By PCB Author

June 17, 2019

वर्धा, दि. १७ (पीसीबी) – सात वर्षाच्या चिमुकल्याने देवळात चोरी केल्याच्या संशयातून एकाने त्याला कडक उन्हाने तापलेल्या फरशीवर बळजबरीने दाबून बसवले, यात त्याचा पार्श्वभागाला दुखापत होऊन त्वचा जळाली. ही धक्कादायक घटना आर्वीमधल्या गुरुनानक धर्मशाळेजळील जोगणामाता मंदिर परिसरात घडली. सध्या चिमुकल्यावर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

याप्रकरणी चिमुकल्याच्या आईने पोलीसात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी आरोपी उमेश उर्फ अमोल ढोरेने याला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आर्वीतील गुरुनानक चौकात जोगणामाता मंदिरात जखमी चिमुकला शनिवारी दुपारी अकराच्या सुमारास खेळायला गेला होता. यावेळी आरोपी उमेशने चिमुकल्याने मंदिराच चोरी केल्याच्या संशयातून विवस्त्र करत फरशीवर बसवले. ज्या फरशीवर चपलेशिवाय पाय ठेवणेही अवघड आहे, तिथे आरोपीने मुलाला विना कपड्याने बसवले. एवढ्यावरच न थांबता त्याने मुलाला फरशीवरच दाबून धरले. यामुळे मुलाचा पार्श्वभाग गंभीररित्या भाजला आहे. यावेळी उमेशने जाब विचारण्यास गेलेल्या मुलाच्या आईला देखील शिवीगाळ केली. घटनेनंतर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी उमेश हा दारु विक्रीचा व्यवसाय करतो त्याच्या विरोधात विविध गुन्हे दाखल आहेत. पोलिसांनी त्याला अटक केली आहे.