धक्कादायक! राज्यात तीन वर्षात १२,००० पेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या आत्महत्या

0
603

मुंबई, दि. २१ (पीसीबी) – राज्यात गेल्या तीन वर्षात बारा हजार पेक्षा अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती मदत व पुनर्वसन मंत्री सुभाष देशमुख यांनी शुक्रवारी विधानसभेत लेखी उत्तरात दिली.

शेतकऱ्यांच्या आत्महत्यांसंदर्भात विधानसभेत प्रश्न विचारण्यात आल्यानंतर त्याला लिखीत स्वरुपात उत्तर देताना देशमुख यांनी म्हटले की, सन २०१५ ते २०१८ या तीन वर्षांच्या काळात सुमारे १२,०२१ शेतकऱ्यांनी राज्यात आत्महत्या केल्या आहेत.

जिल्हास्तरीय कमिट्यांच्या मार्फत केलेल्या पडताळणीतून आत्महत्या केलेल्या १२,०१२ शेतकऱ्यांपैकी ६,८८८ शेतकरी सरकारच्या मदतीसाठी पात्र ठरले आहेत. त्यानुसार, या कुटुंबियांना प्रत्येकी १ लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली आहे.

तसेच जानेवारी आणि मार्च २०१९ दरम्यान ६१० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असून यांपैकी १९२ शेतकऱ्यांचे कुटुंबीय सरकारच्या आर्थिक मदतीसाठी पात्र ठरले आहेत. तसेच या १९२ पैकी १८२ कुटुंबांना मदत देण्यात आली आहे. तर उर्वरीत कुटुंबे अद्याप मदतीसाठी पात्र आहेत की नाहीत याची छाननी सुरु असल्याचे देशमुख यांनी सांगितले.