Maharashtra

धक्कादायक: रागाच्या भरात आईने स्वत:च्या मुलाला पाजले विष; मुलाचा मृत्यू

By PCB Author

November 15, 2018

मुंबई, दि. १५ (पीसीबी) – पतीसोबत होणाऱ्या रोजच्या भांडणाला वैतागून एका महिलेने तिच्या पाच वर्षांच्या चिमुकल्याला कीटकनाशक पाजून स्वत:ही आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या घटनेत चिमुकल्याचा मृत्यू झाला असून महिलेची प्रकृती गंभीर आहे. ही घटना मंगळवार (दि.१३) मुंबईतील सांताक्रूझ येथील शिवाजीनगरमध्ये घडली.

हर्ष आयरे (वय ५) असे मयत चिमुकल्याचे नाव असून रिना असे प्रकृती गंभीर असलेल्या आईचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सांताक्रूझच्या जुहू-तारा रोड येथील शिवाजीनगरमध्ये राजेश आयरे हा पत्नी रिना आणि मुलगा हर्ष यांच्यासह राहतो. रोजंदारीच्या पैशातून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविणाऱ्या राजेशकडे सोमवारी रात्री रिनाने खर्चासाठी पैसे मागितले. राजेशने पैसे देण्यास नकार दिल्याने दोघांमध्ये भांडण झाले. त्यानंतर रागाच्या भरात रिना घरातून निघाली आणि हर्षला सोबत घेऊन जुहु चौपाटी परिसरात आली. एका मेडिकलमधून खरेदी केलेले कीटकनाशक चौपाटीवर बसून ती स्वत: प्यायली. त्यानंतर तिने हर्ष यालाही कीटकनाशक पाजले. मात्र त्याची परिस्थिती पाहून ती हर्षला घेऊन कुपर रुग्णालयात गेली आणि तिथे सर्व प्रकार सांगितला. डॉक्टरांनी याबाबतची माहिती सांताक्रूझ पोलिसांना दिली. उपचारादरम्यान हर्षचा मृत्यू झाला, तर रिनावर कुपर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.