Bhosari

धक्कादायक : मेदनकरवाडीतील जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी शिक्षकाला केली जबर मारहाण

By PCB Author

October 25, 2018

चाकण, दि. २५ (पीसीबी) – विद्यार्थ्याला त्रास देतात म्हणून चौघा जणांनी मिळून एका शिक्षकाला लाकडी दांडक्याने जबर मारहाण केली. ही घटना बुधवार (दि. २४) सकाळी आठच्या सुमारास मेदनकरवाडी येथील जिल्हा परिषद शाळेजवळ घडली.

हर्षल प्रमोदराव राहाटे (वय २७, रा. प्लॉट क्र.१२०५, एच विंग, नक्षत्र आयलॅन्ड, धर्मेंद्रनगर, जुना मोशी आळंदी रोड) असे मारहाण झालेल्या शिक्षकालाचे नाव आहे. याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानुसार, अनिकेत संभाजी शिंदे (रा. खरपुडी. ता. खेड) आणि त्याचे तीन साथीदारांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, हर्षल राहाटे हे मेदनकरवाडी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षक म्हणून काम करतात. बुधवारी सकाळी आठच्या सुमारास ते त्यांच्या दुचाकीवरुन शाळेत जात होते. यादरम्यान आरोपी अनिकेत आणि त्याचे तीन अनोळखी साथीदारांनी मिळून राहाटे यांची दुचाकी आडवली. तसेच शाळेत अनिकेत याला त्रास का देता अशी विचारणा केली. यावर राहाटे यांनी आरोपींना तुम्ही कोण असे विचारणारे असा प्रश्न केला. यामुळे चिडलेल्या आरोपींनी लाकडी दांडक्याने राहाटे यांच्या डोक्यावर आणि पायावर मारुन गंभीर जखमी केले. इतक्यात तिथे शाळेची बस आली आणि आरोपी पळून गेले. याप्रकरणी रहाटे यांनी अनिकेतसह त्याच्या तीन साथीदारांविरोधात चाकण पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. आरोपी फरार असून चाकण पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.