धक्कादायक: मित्राच्या आत्महत्येचा बदला घेण्यासाठी त्याने केला मैत्रीणीचा खून

687

लातुर, दि. १७ (पीसीबी) – लातुर येथील विशाल नगरामध्ये घरात घुसून अपूर्वा यादव या २० वर्षीय तरुणीचा धारदार शस्त्राने खून झाल्याची धक्कादायक घटना मंगळवारी घडली होती. या खूनाचा तपास करताना थक्क करणारी माहिती समोर आली आहे.

याप्रकरणी अपूर्वाच्या वडिलांनी एम. आय. डी. सी पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवली होती. फिर्यादीत संशयीत आरोपी म्हणून उस्मानाबाद तालुक्यातील गोरेवाडी येथील श्रीहरी जाधव आणि त्यांचा मुलगा सनी जाधव यांचा उल्लेख त्यांनी केला होता. मात्र, पोलिसांच्या प्राथमिक तपासानंतर या प्रकरणाने वेगळेच वळण घेतले आहे. अपूर्वाच्या घराजवळ राहणाऱ्या अमर व्यंकटराव शिंदे याने हे कृत्य केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तिवला आहे.

इयत्ता नववीपासून अमर शिंदे, अपूर्वा यादव आणि उस्मानाबाद येथील सार्थक जाधव हे वर्गमित्र होते. कालांतराने सार्थक आणि अपूर्वामध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले. परंतू शिक्षणासाठी सार्थक हा औरंगाबादला गेला, तर अपूर्वा ही कर्नाटकातील तरडेल येथे आयुर्वेदिक मेडिकलचे शिक्षण घेत होती. त्यांच्या या संबंधाविषयी अमर शिंदे याला संपूर्ण माहिती होती. काळाच्या ओघात अपूर्वा आणि सार्थक यांच्यामध्ये दुरावा निर्माण झाला. हा दुरावा सहन न झाल्याने ५ महिन्यांपूर्वी सार्थकने आत्महत्या केली होती. आत्महत्येला अपूर्वाच जबाबदार असल्याची फिर्याद सार्थकच्या वडिलांनी उस्मानाबाद जिल्ह्यातील ढोकी पोलीस ठाण्यात दिली होती. त्यानुसार अपूर्वा आणि माऊली घोलप यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता.

अपूर्वामुळेच आपल्या मित्राला आत्महत्या करावी, असा समज अमर शिंदे याला झाला. त्याचे शल्य त्याला सतत बोचत होते. मित्राच्या आत्महत्येचा बदला अमरने अपूर्वाचा खून करुन घेतल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक माळी करत आहेत.