धक्कादायक…भयंकर… निगडी स्मशानभुमीत कुत्रे तोडताहेत मृतदेहांचे लचके!

0
631

ठेकेदार व दोषी अधिकाऱ्यांवर कडक कारवाई मागणी

पिंपरी दि ०७ (पीसीबी) – निगडी येथील अमरधाम स्मशानभुमीमध्ये कोरोना बाधित अर्धवट जळालेले मृतदेह काही कुत्री खात असल्याचा घृणास्पद प्रकार नुकताच उघडकीस आला आहे. कोरोनाबाधित मृतदेहांवर महापालिकेतर्फे मोफत अंत्यसंस्कार केले जातात. त्यासाठी महापालिकेने एका संस्थेची नेमणूक केली आहे, तरी देखील असे प्रकार घडत आहेत.त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची तात्काळ दखल घेऊन संबंधित ठेकेदार व दोषी अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते दिपक खैरनार यांनी केली आहे.

याबाबत आयुक्तांना दिलेल्या तक्रार अर्जात म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेकडुन कोरोनाबाधित एका मृतदेहामागे आठ हजार रुपये खर्च महापालिका उचलते, तरीही स्मशानभूमीत मृतदेह अर्धवट जळत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दि.०२ जून २०२१ रोजी एका अंत्यविधीच्या निमित्ताने निगडी स्मशान भूमीत गेलो होतो. अंत्यविधी उरकल्यानंतर मला त्या ठिकाणी काही कुत्र्यांचा गराडा दिसला. मी त्यांच्या जवळ जाऊन पाहिले असता ते कुत्रे अर्धवट जळालेला कोरोनाबाधित मृतदेहाचा पाय खात होते. या संपूर्ण प्रकाराचे मी व्हिडिओ चित्रीकरण करून ठेवलेले आहे. निकृष्ट दर्जाची लाकडे आणि बहुतांश वेळा लाकडाचा कमी वापर केल्याने योग्य प्रकारे राख होत नसल्याचे आढळले आहे. यातूनच भटकी कुत्री कोरोनाबाधित मृतदेहाचे लचके तोडत आहेत. कुठल्याही प्रेताची अवहेलना होऊ नये, त्याला शेवटचा निरोप सन्मानाने दिला पाहिजे.याउलट कोरोनाने मयत झालेली व्यक्ती स्मशानभूमीतही चिरनिद्रा घेऊ शकत नाही, ही अत्यंत संतापजनक बाब आहे. कोरोनाबाधित मृतदेहांच्या अंत्यविधीसाठी संस्थेची नेमणूक केली म्हणजे महापालिकेची जबाबदारी संपली काय? त्यामुळे या प्रकरणात दोषी असणाऱ्या ठेकेदाराला कायमस्वरूपी काळया यादीत टाकावे व यात दोषी असणाऱ्या अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते दिपक खैरनार यांनी केली आहे.