Maharashtra

धक्कादायक: बीड जिल्ह्यात गरिबीला कंटाळून १३ हजार महिलांनी गर्भाशये काढली

By PCB Author

August 29, 2019

मुंबई, दि. २९ (पीसीबी) – बीड जिल्ह्य़ातील सुमारे १३ हजार ऊसतोड मजूर महिलांची गर्भाशये काढल्याची धक्कादायक माहिती चौकशी समितीच्या तपासात उघडकीस आली आहे. महिलांमधील आरोग्याबद्दलचे अज्ञान, लहान वयात होणारी लग्ने, गरिबी यातून हे प्रकार घडल्याची माहिती विधान परिषदेच्या उपसभापती व चौकशी समितीच्या अध्यक्षा डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिली.

समितीने प्रत्यक्ष बीड जिल्ह्य़ात जाऊन तेथील आरोग्य अधिकारी, कामगार अधिकारी, साखर आयुक्त विभागातील अधिकारी, तसेच ऊसतोड महिलांच्या भेटी घेऊन सविस्तर माहिती घेतली. त्यासंबंधीचा अहवाल बुधवारी त्यांनी आरोग्यमंत्र्यांना सादर केला. या वेळी आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास, संचालक डॉ. साधना तायडे, डॉ. अर्चना पाटील आदी अधिकारी उपस्थित होते.

महिलांच्या आरोग्यास हानीकारक असणाऱ्या गर्भाशय काढून टाकण्याच्या शस्त्रक्रिया केल्या जाऊ नयेत, यासाठी या महिलांना कामाच्या ठिकाणी मूलभूत व प्राथमिक सुविधा पुरविण्याच्या शिफारशी समितीने केल्या आहेत, असे गोऱ्हे यांनी सांगितले.