धक्कादायक: निर्दयी आईने पोटच्या १० दिवसाच्या मुलीचा गळा दाबून केला खून

0
480

नाशिक, दि. ३ (पीसीबी) – तिसरी देखील मुलगीच झाल्याच्या रागातून निर्दयी आईने पोटच्या १० दिवसाच्या मुलीचा गळा दाबून खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना नाशिकच्या आडगाव परिसरात घडली.

याप्रकरणी मृत मुलीचे वडिल बाळासाहेब काळे यांनी आडगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी अनुजा काळे या निर्दयी आईला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी बाळासाहेब काळे हे दिव्यांग असून कृषी सहायक अधिकारी म्हणून त्यांची नाशिकच्या कृषी विभागात ते कार्यरत आहे. तीन दिवसांपूर्वी काळे यांच्या राहत्या घरात त्यांच्या १० दिवसाच्या मुलीचा संशयास्पद मृत्यू झाला. पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेत तपास सुरू केला. मुलीच्या शवविच्छेदन अहवालात तिचा गळा आवळून हत्या झाल्याचे समोर आले. यावरून पती बाळासाहेब काळे यांनी पत्नी अनुजा काळे हिच्या विरोधात मुलीची हत्या केल्याचा गुन्हा आडगाव पोलीस ठाण्यात दाखल केला आहे.

पोलीसांनी देखील अनुजा काळे हिला अटक करून चौकशी सुरू केली आहे. बाळासाहेब काळे यांच्या एका मुलीचा काही महिन्यांपूर्वी आजारामुळे मृत्यू झाला आहे. तर, दुसरी ७ वर्षाची मुलगी मधुमेह रुग्ण आहे. अशात जन्माला आलेल्या तिसऱ्या मुलीचा द्वेष करून अनुजा हिने मी घरी नसतांना मुलीची हत्या केली, असे बाळासाहेब काळे यांनी म्हटले आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.