धक्कादायक : दोन महिन्यांच्या चिमुकलीचा आई-वडिलांनीच विष पाजून केला खून

0
1188

कोल्हापूर, दि. १३ (पीसीबी) – दुसऱ्यांदाही मुलगी झाल्याने जन्मदात्या आई-वडिलांनीच दोन महिन्यांच्या चिमुकलीला जेवणातून विष देऊन तिचा खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना कोल्हापूर जिल्हा शाहूवाडी तालुक्यातील सावर्डी गावात घडली.

प्रकाश पाडावे (वय २८) आणि जयश्री पाडावे (वय २१, दोघेही, रा. शाहूवाडी, सावर्डी) अशी आरोपी आई-वडिलांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी प्रकाश आणि जयश्री या दाम्पत्याला प्रांजल (वय २ वर्ष) ही पहिली मुलगी आहे. या दाम्पत्याला दुसरीही मुलगीच झाली. त्यामुळे दुसऱ्या दोन महिन्यांच्या मुलीचा या दाम्पत्याने खून करण्याचे ठरवले. त्यांनी ऑक्टोबरमध्ये जेवणात विष टाकून त्याचा घास मुलीला भरवला. विषप्रयोगामुळे चिमुरडीची प्रकृती खालावली. यानंतर दाम्पत्याने तिला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, त्या मुलीचा मृत्यू झाला. दाम्पत्यावर संशय आल्याने डॉक्टरांनी शवविच्छेदनाचा निर्णय घेतला. चिमुरडीच्या व्हिसेराच्या तपासणीतून विषप्रयोग केल्याचे स्पष्ट झाले. दोन महिन्यांनी हा अहवाल पोलिसांना प्राप्त झाला. अखेर पोलिसांनी संशयाच्या आधारे प्रकाश आणि जयश्री या दोघांची चौकशी केली असता दुसरी मुलगी झाल्याने तिचा खून केल्याचे त्या दोघांनी कबुल केले. पोलिसांनी दोघांनाही अटक केली आहे.