धक्कादायक; ढोंगी दुर्गा देवीच्या दरबारावर छापा टाकून भंडाफोड

0
758

नागपूर, दि.१७ (पीसीबी) – शेडेश्वर येथील दुर्गा महादेव किनाके ही ३१ वर्षीय तरुणी स्वतःच्या अंगात देवी आणण्याचे नाटक करून लोकांची लुबाडणूक करीत होती. घरी बुवाबाजीचा दरबार भरवून आजारी भक्तांवर बेकायदेशीरपणे उपचार करीत होती. याबाबतची तक्रार बेला पोलिस ठाणे व अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडे करण्यात आल्यामुळे या ढोंगी देवीच्या दरबारावर छापा टाकून तिच्यासह भगत गुलाब येवले (वय ४७, शिरसी) या दोघांना जादूटोणाविरोधी कायद्यांतर्गत अटक करण्यात आली. या घटनेने भक्तगण व गावात खळबळ उडाली.

अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या महिला संघटक छाया दिलीप सावरकर (वय ५४, नागपूर) यांच्याकडे प्राप्त तक्रारीवरून तेजस श्रावण मोहिते (वय २५, बुटीबोरी) व त्याची आई नेहमी आजारी असल्यामुळे त्यांना उपचारासाठी आरोपी दुर्गाकडे नेण्यात आले. मंगळवारी गुरुपौर्णिमा असल्याने सिद्धेश्वर येथे दुपारी घरी दरबार भरला होता. यावेळीही अंगात बोंडगाव गोंदिया येथील गंगामाई आल्याचे सांगून आपल्याकडे दैवीशक्ती आहे. संतानप्राप्ती करून दुर्धर आजारावर इलाज करीत असल्याची थाप मारून तेजस मोहिते याला घरच्यांनीच जादूटोणा केला आहे, अशी भीती दाखवली व दहा हजार रुपयांची मागणी केली. ती आजारी भक्तांना ताविज, गंडेधागेदोरे बांधून व अंगारा देत असताना असताना बेला पोलिसांनी तिला रंगेहात पकडले. यावेळी वेळी अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रकल्प संचालक व जादूटोणाविरोधी कायदा समितीचे सदस्य सुरेश झुरमुरे, नीलेश पाटील, बेला शाखेचे उत्तम पराते, अमृत धोत्रे, मारुती पारधे यांनी सहकार्य केले. धाडीच्या प्रसंगी दरबारात पंचक्रोशीतील अंदाजे ५०० पेक्षा अधिक भक्‍त उपचारासाठी गोळा झाले होते.