Bhosari

धक्कादायक; चिखलीत पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीची आत्महत्या, पत्नी पोहोचली पोलिस कोठडीत

By PCB Author

December 04, 2018

भोसरी, दि. ४ (पीसीबी) – पती आणि सासरच्यांच्या छळाला कंटाळून महिलांची आत्महत्या झाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. परंतु, चिखलीत पत्नीच्या छळाला कंटाळून पतीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. संबंधित पत्नीला पोलिसांनी अटक करून न्यायालयासमोर हजर केले असता चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

तृप्ती जय तोलवाणी (वय २१) असे पतीचा छळ करून त्याला आत्महत्येस प्रवृत्त केलेल्या महिलेचे नाव आहे. जय देवीदास तेलवाणी (वय २५, रा. श्री साई सोसायटी, घरकुल, मोरेवस्ती, चिखली) असे आत्महत्या केलेल्या पतीचे नाव आहे. याप्रकरणी जयची आई कांचन देवीदास तेलवाणी (वय ४०, रा. काळेवाडी) यांनी चिखली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तृप्तीला पैसे खर्च करण्याची सवय होती. तिला पैसे कमी पडले म्हणून तिने जयला कर्जही काढायला भाग पाडले होते. पैसे कमी पडले की वारंवार मागणी करून ती जयचा छळ करायची. तसेच जयला शिवीगाळ करून मारहाणही करत असे. जयने विरोध केल्यास स्वतःच्या जिवाचे बरे वाईट करण्याची धमकी द्यायची. तसेच पतीला कॅन्सर झाल्याचा टिक टॉक व्हिडीओ बनवून त्याच्या मित्रांना दाखवले. मित्रमंडळींमध्ये प्रचंड बदनामी झाल्याने आणि तृप्तीच्या त्रासाला कंटाळून जयने १३ नोव्हेंबर रोजी आत्महत्या केली. पोलिसांनी तृप्तीला अटक करून न्यायालयासमोर हजर केले. न्यायालयाने तिला चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.