धक्कादायक घटना! नातेवाईकांनी मृताचे पाय धुऊन पिले पाणी आणि कोरोना…..

0
1288

लोणी काळभोर, दि.२० (पीसीबी) : राज्य कोरोनाचा संसर्ग वेगाने पसरत आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी संपूर्ण पुणे जिल्ह्यात कठोर निर्बंध लावण्यात आले आहेत. यामध्ये लग्न सोहळ्यासाठी पंचवीस आणि अंत्यविधीसाठी फक्त वीस लोकांनाच परवानगी देण्यात आली आहे. परंतु असे असले तरी नागरिक याकडे सर्रास दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे. लोणी काळभोर पोलीस स्टेशनच्या हद्दीतुन एक असाच धक्कादायक प्रकार उघडकीस आला. एका 70 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाचा अल्पशा आजाराने मृत्यू झाला आणि त्यानंतर जे घडलं ते हादरवून टाकणार होत. कारण, त्याच्या अंत्यविधीला अनेक लोकांनी उपस्थिती तर लावलीच पण त्यासोबतच अंत्यविधी करताना नातेवाईकांनी मयत व्यक्तीचे पाय धुऊन ते पाणीही प्यायले. नातेवाईकांनी मृताचे पाय धुऊन पाणी पिले आणि कोरोना नियमांचे सुद्धा उल्लंघन केले. 

या संपूर्ण घटनेनंतर सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे. त्यामुळे हा धक्कादायक प्रकार एका सामाजिक कार्यकर्त्याने सोशल मीडियावर पोस्ट टाकून उघडकीस आणला. त्यानंतर लोणी काळभोर पोलिसांनी या प्रकरणी कठोर कारवाई करणार असल्याचे सांगितले. अशाप्रकारे नियमांचे उल्लंघन करून जर कोणी लग्न सोहळा, अंत्यसंस्कार करत असतील तर नागरिकांनी त्याची माहिती पोलिसांना द्यावी. पोलिस तातडीने घटनास्थळी उपस्थित राहून संबंधितावर कारवाई करतील, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनी दिली.