Maharashtra

धक्कादायक: कोजागिरी पौर्णिमेनिमित्त आणलेल्या दुधात प्लास्टिकच्या पावडरचा चुरा

By PCB Author

October 24, 2018

गोंदिया, दि. २४ (पीसीबी) –  कोजागिरी पौर्णिमेसाठी आणलेल्या दुधाच्या पॉकेटमध्ये प्लास्टिकच्या पावडरचा चुरा आढळल्याचा धक्कादायक प्रकार गोंदिया जिल्ह्याच्या देवरी तालुक्यातून समोर आला आहे. हल्दीराम कंपनीचे हे दूध असून ४० लिटर दूध कंपनीला परत पाठविण्यात आले आहे.

याप्रकाराची हल्दीराम कंपनीच्या अधिकाऱ्यांकडे तसेच महाराष्ट्र शासनाच्या आपले सरकार वेबपोर्टल वर तक्रार करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गोंदिया जिल्ह्यातील देवरी तालुक्याच्या धुकेश्वरी देवस्थानात कोजागिरी पौर्णिमेनिमित्त हल्दीराम कंपनीचे ४० लिटर दूध आणले होते. एका खोल पात्रात ते दूध गरम करण्यासाठी ओतण्यात आले असता त्यातून फायबरसारखा दिसणारा प्लास्टिकचा चुरा आढळल्याने मोठी खळबळ उडाली. गावकऱ्यांनी याप्रकरणी कंपनीकडे तक्रार केली असून संबधित कंपनीच्या अधिकाऱ्यांनी समाधानकारक उत्तर न दिल्याने ते दूध वापस पाठविण्याचे ठरविले. मात्र हल्दीरामसारख्या नामांकित कंपनीच्या दुधात देखील भेसळ झाल्याचे समोर आल्याने विश्वास कुणावर ठेवायचा? असा प्रश्न नागरिकांसमोर निर्माण झाला आहे.