धक्कादायक: आकुर्डीत पैसे परत न करणाऱ्या इसमाच्या घरासमोर पेटवून घेत आत्महत्या

0
429

आकुर्डी, दि. २० (पीसीबी) – कामाचे दिलेले पैसे परत न केल्याने खचलेल्या एका २८ वर्षीय तरुणाने पैसे परत न करणाऱ्या इसमाच्या घरासमोर अंगावर पेट्रोल ओतून पेटवून घेत आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना शुक्रवारी (दि.१७) सकाळी दहाच्या सुमारास दुर्गानगर झोपडपट्टी आकुर्डी येथे घडली.

संदिप बैसाने (वय २८, रा. बामणे, सिंदखेडा, धुळे) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी त्याचा भाऊ सतिश उंदा बैसाने (वय ३६, रा. बामणे, सिंदखेडा, धुळे) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, मंगल बापू आव्हाड (वय ३८, रा. दुर्गानगर, आकुर्डी) विरोधात आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी संदिप याने त्याच्या कामाचे पैसे आरोपी मंगल यांना दिले होते. मात्र बरेच दिवस उलटून देखील मंगल याने संदिपचे पैसे परत केले नाही. यामुळे हताश झालेल्या संदिपने मंगल यांच्या आकुर्डीतील घरासमोर अंगावर पेट्रोल ओतून पेटवून घेतले. यामध्ये ते गंभीर भाजल्याने त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी रविवारी (दि.१९) मंगल विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निगडी पोलीस तपास करत आहे.