दौंड तालुक्यातील कासुर्डी येथे तरुणीवर सामूहिक बलात्कार; तक्रार देण्यास गेलेल्या पीडितेच्या वडिलांचा पोलीस ठाण्यातच मृत्यू

0
781

दौंड, दि. १३ (पीसीबी) – दौंड तालुक्यातील कासुर्डी येथील शेतात उसाच्या गुऱ्हाळावर मजूर म्हणून काम करणाऱ्या एका तरुणीवर तिघांनी मिळून सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. इतकेच नाही तर तक्रार देण्यास पोलीस ठाण्यात गेलेल्या तिच्या वडिलांचा ह्दयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. ही घटना बुधवार (दि.१० ऑक्टोबर) रोजी घडली होती.

याप्रकरणी पीडित तरुणीने उत्तराखंड येथील गंगाहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार दौंड तालुक्यातील यवत पोलीस ठाण्यात तक्रार वर्ग करुन दोघांना अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तराखंडमधील पीडित तरुणी आणि तिचे कुटुंबीय दौंड तालुक्यातील खामगाव येथील गुऱ्हाळावर मजूर होते. ठेकेदार नदीम याने पीडितेला बुधवार (दि.१० ऑक्टोबर) कामाचे कारण सांगून कासुर्डीच्या हद्दीतील एका शेतात बोलावून घेतले. तेथे त्याचा भाऊ मोहसीन व साथीदार दिलवाज फुरकान (तिघे रा. उत्तराखंड) यांनी आळीपाळीने तिच्यावर बलात्कार केला. पीडितेच्या वडिलांनी जाब विचारला असता आरोपींनी संपूर्ण कुटुंबालाच काही दिवस डांबून ठेवले. आरोपींनी बुधवार (दि.१७ ऑक्टोबर) रोजी साडेसात हजार रुपये देऊन दौंड येथून दिल्लीला जाणाऱ्या रेल्वेमध्ये या कुटुंबाला बसवून दिले आणि कोणाला काही सांगितल्यास जिवे मारू अशी धमकी दिली. मात्र, पीडितेने कुटुंबीयांसोबत गंगाहर पोलीस ठाणे (ता. रुडकी, उत्तराखंड) येथे फिर्याद दिली. ती यवत पोलिसांकडे वर्ग करण्यात आली. त्यावरून मोहसीन आणि दिलवाज या दोघांना अटक करण्यात आली. तर नदीम फरार आहे. दरम्यान, पीडिता व तिचे वडील मंगळवारी यवत पोलीस ठाण्यात आले होते. तेथे तिच्या वडिलांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. यवत पोलीस तपास करत आहेत.