दोन राज्यातून चार दिवसांत १.४१ कोटींची दंडवसुली

0
486

मुंबई, दि.६ (पीसीबी) – वाहतूक नियमांचा भंग करणाऱ्या वाहनधारकांना १ सप्टेंबरपासून अधिक दंड भरावा लागत आहे. नियम लागू करण्यात आल्यानंतर तब्बल १.४१ कोटी रूपयांची दंडवसुली करण्यात आली आहे. हरियाणा आणि ओडिसा या राज्यातून केवळ चार दिवसांत एक कोटी ४१ लाख २२ हजार रूपयांचा दंड वसुल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

वाहतुकीचे नियमभंग होण्याच्या प्रकारांना चाप बसावा या उद्देशाने मोटार वाहन कायद्यात काही सुधारणा करण्यात आल्या आहेत. ओडिशा राज्यात वाहतुकीचे नवे नियम लागू झाल्यापासून सुमारे ४,०८० चलनांद्वारे ८८ लाख ९० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. तर ४६ वाहने जप्त करण्यात आली आहेत. हरियाणामध्ये ३४३ जणांकडून सुमारे ५२ लाख ३२ हजार रुपयांची दंडवसुली करण्यात आली आहे. तर दिल्लीमध्ये नवा कायदा लागू झाल्याच्या पहिल्याच दिवशी वाहतूक विभागाच्या पोलिसांनी सुमारे ३,९०० जणांवर कारवाई केल्याचे रस्ते वाहतूक आणि महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

नव्या मोटार वाहतूक कायद्यातील ६३ तरतुदी लागू करण्यासंदर्भात केंद्र सरकारने अधिसूचना काढली आहे. अर्थसंकल्पी अधिवेशनात संसदेच्या दोन्ही सदनात मोटार वाहतूक दुरुस्ती विधेयक संमत करण्यात आले होते. वाहतूक नियमांचा भंग केल्यास आकारला जाणारा दंड आता भरघोस वाढवण्यात आला आहे. यात कमीत कमी म्हणजे ५०० रुपये दंड हा रस्ते नियम तोडण्यासाठी असून जास्तीत जास्त म्हणजे २५ हजार रुपये दंड आणि तीन वर्षांचा तुरुंगवास हा अल्पवयीन मुला-मुलीने वाहन चालवून गुन्हा केल्यास मालक वा पालकाला भोगावा लागणार आहे.

वाहतूक नियम अधिक कठोर –

* रस्ते नियमांचा भंग – जुना दंड १०० रु., नवीन दंड ५०० रु

* प्रशासनाचा आदेशभंग- जुना दंड ५०० रु, नवीन दंड २,००० रु.

* परवाना नसलेले वाहन चालवणे – जुना दंड – ५०० नवीन दंड- ५,००० रु.

* पात्र नसताना वाहन चालवणे- जुना दंड ५०० रु, नवीन दंड १०,००० रु

* वेगमर्यादा तोडणे – जुना दंड – ४०० रु, नवीन दंड – २,००० रु

* धोकादायक वाहन चालवणे, जुना दंड – १,०००, नवीन दंड ५,००० रु

* दारू पिऊन वाहन चालवणे – जुना दंड २,००० रु, नवीन दंड – १०,००० रु.

* वेगवान वाहन चालवणे- जुना दंड – ५०० रु, नवीन दंड – ५,००० रु

* विनापरवाना वाहन चालवणे – जुना दंड, ५,००० रु., नवीन दंड – १०,०००

* सीटबेल्ट नसणे – जुना दंड- १०० रु, नवीन दंड – १,००० रु

* दुचाकीवर दोनपेक्षा जास्त व्यक्ती – जुना दंड -१०० रु, नवीन दंड – २,००० रु

* अ‍ॅम्ब्युलन्ससारख्या महत्त्वाच्या वाहनांना रस्ता न देणे – नवीन दंड – १०,०००

* विमा नसताना वाहन चालवणे – जुना दंड १,००० रु, नवीन दंड – २, ००० रु

* अल्पवयीन मुला-मुलींकडून गुन्हा — २५,००० रु. दंड व मालक – पालक दोषी. ३ वर्षे तुरुंगवास.