Maharashtra

दोन मित्रांना फिरायची हौस, मग काय तब्बल 10 मोटारसायकलची चोरी; आणि नंतर…

By PCB Author

January 02, 2021

सोलापूर, दि.२ (पीसीबी): मौजमजा करण्यासाठी तसेच मोटारसायकल चालवण्याचा आनंद लुटण्यासाठी दोन मित्रांनी तब्बल 10 दुचाकी चोरल्याची धक्कादायक घटना सोलापुरात घडली आहे. चोरलेल्या दहा दुचाकींची किंमत तब्ब्ल 10 लाख रुपये आहे. चोरी करणारे दोन्ही मुले अल्पवयीन आहेत. विशेष म्हणजे गाडी चोरण्यासाठी या मुलांकडून बनावट चावीचा वापर करण्यात येत होता. पोलिसांनी या दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. तसेच, त्यांनी चोरलेल्या मोटारसायकलही जप्त करण्यात आल्या आहेत. हा प्रकार समोर आल्यामुळे शहरात खळबळ उडाली आहे.

मोटारसायकल चोरीमुळे शहरात खळबळ मागील अनेक दिवसांपासून शहरात मोटारसायकल चोरीला जाण्याचे प्रकार वाढले होते. या घटनेचा तपास पोलिसांकडून सुरु होता. मात्र, पोलिसांना म्हणावे तसे यश मिळत नव्हते. विशेषत: शहरातील फौजदार चावडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत दुचाकी चोरीच्या प्रकारांमध्ये विशेष वाढ झाली होती. त्यामुळे वाढत्या मोटरसायकल चोरीच्या घटनांचा तपास करण्यासाठी पोलिसांचे वेगळे पथक तैनात करण्यात आले होते. या पथकाच्या तपासादरम्यान काही मोटारसायकली बेवारस स्थितीत आढळून आल्या. पोलिसांना शंका आल्यामुळे मिळालेल्या पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी तपास सुरु केला. त्यानंतर पकडलेल्या मुलांपैकी एका अल्पवयीन मुलाची पोलिसांनी चौकशी केली. कसून चौकशी केल्यानंतर त्याने आणि त्याच्या मित्राने चोरी केल्याची कबुली दिली आहे.

चोरीसाठी बनावट चावी मिलालेल्या माहितीनुसार हे दोन्ही मुले मोटारसायकल चोरण्यामध्ये तरबेज आहेत. एखाद्या सराईत गुन्हेगारासारखी हे मुलं चोरी करायचे. त्यांच्या घरची परिस्थिती हलाखीची असल्यामुळे ते गाड्या चालवण्याचा आनंद घेण्यासाठी गाड्या चोरत होते. त्यासाठी त्यांनी एक बनावट चावी तयार करुन घेतली होती. गॅरेजमध्ये काम करणाऱ्या मित्राकडून त्यांनी ही चावी तयार करुन घेतली होती. याच चावीच्या आधारे हे मुलं गाडी चालू करत असत. गाडीमधील पेट्रोल संपल्यानंतर ते गाडी तिथेच सोडून दोन-तीन दिवसांनी दुसरी गाडी चोरत असत. दरम्यान, आतापर्यंत केलेल्या तपासातून त्यांनी अनेक गाड्यांची चोरी केल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून 10 मोटारसायकल जप्त केल्या आहेत.