Banner News

“दोन कोटींवर डल्ला मारणारा भाजपाचा ‘तो’ पदाधिकारी कोण?”

By PCB Author

October 22, 2021

– अनधिकृत होर्डिंग्ज हटवण्याचे काम असताना काढले २० हजार किऑक्स

पिंपरी, दि. २२ (पीसीबी) :- पिंपरी चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी भाजपा नगरसेवकांनी केलेले काही गैरव्यवहार रोज चव्हाट्यावर येत असतानाच आता पक्षाच्या पदाधिकाऱ्याने केलेली तब्बल दोन कोटींच्या लुटीचे एक अत्यंत गंभीर प्रकरण चर्चेत आले आहे. भाजपा नेत्यांनी आणि त्यांच्या काही बगलबच्यांनी सत्तेचा दुरूपयोग करून मर्जीतील ठेकेदाराला पुढे करून कोट्यवधी रुपयांची कामे घेतली आहेत. घेतलेले काम पूर्ण न करताच त्यापोटी कोट्यवधी रुपयांची बिले लाटल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

आकाशचिन्ह परवाना विभागाने शहरातील अनधिकृत होर्डिंग्ज काढण्याचे काम हाती घेतले होते. एका ठेकेदाराने काम न करताच भलताच उद्योग केला आहे. कामाच्या करारनाम्यात नामोल्लेख नसताना विद्युत पोलवर लावलेली २० हजार किऑक्स बेकायदेशीरपणे काढली आहेत. याउलट होर्डिंग्ज काढल्याची खोटी माहिती प्रशासनाला सादर करून त्यापोटी २ कोटी रुपयेंची बिले वसूल केली आहेत. यामध्ये भाजप संघटनेतील एका पदाधिका-याचा हात असल्याची माहिती समोर आल्याने भाजपाच्या गोटात प्रचंड अस्वस्थता आहे. शहर भाजपातर्फे विरोधकांच्या आरोपांना प्रत्युत्तर देणारा प्रमुख पदाधिकारीच सरळ सरळ लूट करताना रंगे हाथ सापडल्याने खळबळ आहे. भाजपाचा तो पदाधिकारी नेमका कोण याचा शोध घेणे सुरू आहे. दरम्यान, भाजपाचा बडा मासा गळाला लागल्याने राष्ट्रवादी काँग्रेस आता या प्रकऱणावर कठोर कारवाईची मागणी करणार असल्याचे समजले.

पिंपरी-चिंचवड शहरात अनधिकृत होर्डिंग्जमुळे बकालपणा वाढला आहे. महापालिकेतील आकाशचिन्ह परवाना विभागाद्वारे २०१७-१८ मध्ये अनधिकृत होर्डिंग्ज स्ट्रक्चरसह काढण्याची दोन कोटी खर्चाची निविदा राबविण्यात आली. एका संस्थेला हे काम देण्यात आले. झालेल्या करारनाम्यातील अटी व शर्तींनुसार निर्धारित काम करणे बंधनकारक असताना ठेकेदार संस्थेने अनधिकृत होर्डिंग्ज बाजुला ठेवून २० हजार किऑक्स काढली. त्यानंतर अनधिकृत होर्डिंग्ज काढल्याची खोटी माहिती सादर करून दोन कोटींची बिले सादर केली. दोन कोटींची बिले देखील उचलली. त्यानंतर लेखापरिक्षणात हा सगळा प्रकार उघडकीस आला. मूळात अनधिकृत होर्डिंग्ज काढण्याचे काम असताना किऑक्स काढल्याची बाब मुख्य लेखापरिक्षणात समोर आली. त्यामुळे ठेकेदाराचे बिंग फुटले आहे. यामध्ये शहरातील भाजप संघटनेतील एका पदाधिका-याचा हात असल्याची चर्चा केली जात आहे.

प्रशासनावर दबाव टाकून लाटली २ कोटींची बिले महापालिकेतील आकाशचिन्ह परवाना विभागाद्वारे शहरातील अनधिकृत होर्डिंग्जची माहिती घेण्यासाठी सर्वेक्षण घेण्यात आले. त्यामध्ये पालिका हद्दीमध्ये एकूण १ हजार ७६८ होर्डिंग्ज अनधिकृतपणे उभारण्यात आली आहे. ही माहिती समोर आल्यानंतर ती हटवण्यासाठी वेगळी अशी निविदा काढण्यात आली. यामध्ये भाजप संघटनेतील एका पदाधिका-याचा सुरूवातीपासून सहभाग आहे. हे काम मिळवण्यासाठी या पदाधिका-याने आकाशचिन्ह परवाना विभागातील एका निवृत्त पदाधिका-याला हाताशी धरून प्रशासनावर दबाव आणला. त्यानंतर या ठेकेदाराला काम देण्यात आले. काम करण्यापेक्षा खोटी माहिती सादर करून दोन कोटींची बिले काढण्याचा प्रताप त्याच पदाधिका-याचा आहे. या पदाधिका-याचे नाव उघडपणे घ्यायला कोणी तयार नाही. ठेकेदाराच्या खांद्यावर बंदूक ठेवून त्याने पालिकेत कोट्यवधी रुपयांची लूट केल्याची चर्चा आहे. या भ्रष्ट पदाधिका-यावर पक्षाच्या वरीष्ठ स्तरावरून कारवाई होणार का ? असा सवाल उपस्थित होत आहे.