दोन्ही डोस घेतल्यानंतरही कोरोना, नागरिकांमध्ये घबराट

0
340

दिब्रुगड, दि. २० (पीसीबी) – कोरोनाच्या अल्फा आणि डेल्टा व्हेरिएंटने डोकं वर काढायला सुरूवात केली आहे. देशात सगळ्या ठिकाणी कोरोनाप्रतिबंधक लसीकरण सुरू आहे. सरकारकडून लसीचे दोन्ही डोस घेण्याचं नागरिकांना आवाहन केलं जात आहे. अशातच एक आसाममध्ये धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दरम्यान, दोन्ही डोस घेतल्यानंतरही कोरोना होत असल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे.

आसाममधील एका डॉक्टर महिलेला एकाच वेळी कोरोनाच्या अल्फा आणि डेल्टा व्हेरिएंटची लागण झाली असल्याचं समजत आहे. दिब्रुगड येथील इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च या संस्थेच्या प्रादेशिक वैद्यकीय संशोधन केंद्रात केलेल्या चाचण्यांवरून हे स्पष्ट झालं आहे. एकाच वेळी या दोन्ही व्हेरिएंटची लागण होण्याची ही पहिलीच केस असल्याचं तज्ज्ञांनी म्हटलं आहे.

धक्कादायक बाब म्हणजे दोन्ही व्हेरिएंटची लागण झालेल्या महिलेनं कोरोनाप्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतले होते. दुसरा डोस घेतल्यानंतर साधारण एक महिन्यानंतर डॉक्टर महिलेला दोन्ही व्हेरिएंटची लागण झाली. या महिलेला सौम्य लक्षण असल्यामुळे तिला रूग्णालयात दाखल न करता, तिच्यावर घरच्या घरीच उपचार करून ती बरी झाली. संबंधित महिलेचे पतीही डॉक्टर असून, त्यांनाही एका व्हेरिएंटची लागण झाली होती.

जेव्हा दोन व्हेरिएंटच्या व्यक्ती एकमेकांच्या संपर्कात येतात. तेव्हाच एकाच वेळी दोन्ही व्हेरिएंटची लागण होत असल्याचं, प्रादेशिक वैद्यकीय संशोधन केंद्रातले वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. बी. जे. बोर्काकोटी यांनी सांगितलं. तसेच एखाद्या व्यक्तीला एका व्हेरिएंटचा संसर्ग होता. त्यानंतर दोन-तीन दिवसांमध्ये त्या संबंधित व्यक्तीच्या शरिरात अँटीबॉडीज विकसित होण्याआधीच ती व्यक्ती एखाद्या व्हेरिएंट संसर्गाची लागण झालेल्या व्यक्तीच्या संपर्कात आल्यास त्या व्यक्तीला दुसऱ्या व्हेरिएंटचाही संसर्ग होऊ शकत असल्याचंही बोर्काकोटी यांनी सांगितलं.