Pune

दोनशे रुपयांच्या बनावट नोटांसह देहुरोड येथील तरुणाला अटक

By PCB Author

January 24, 2019

पुणे, दि. २४ (पीसीबी) – युट्युबवर व्हिडिओ पाहून बनावट नोटा तयार करुन त्या पुण्यातील बाजारात वटवण्याच्या तयार असलेल्या एका तरुणाला गुन्हे शाखेकडून अटक करण्यात आली आहे.

सोहेल सलीम शेख (वय २१, रा. गांधीनगर, देहूरोड) असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सोहेल शेख याने काही दिवसांपूर्वी युट्युबवर बनावट नोटा तयार करण्याचा व्हिडिओ पाहिला होता. त्यानंतर त्याने नवीन प्रिंटर विकत घेतला आणि व्हिडिओत दाखवल्या प्रमाणे २०० रुपयांच्या बनावट नोटा तयार करण्यास सुरुवात केली. २०० रुपयांच्या नोटा तयार केल्यानंतर त्या शहरातील किरकोळ विक्रेत्यांकडे त्याने वटविण्यास सुरुवात केली. पानपट्टीचालक तसेच किरकोळ विक्रेत्यांना त्याने बनावट नोटा दिल्या आणि त्या बदल्यात बिस्किटे, चॉकलेट, सिगारेट अशा वस्तूंची खरेदी केली. गेल्या १५ दिवसांपासून हा प्रकार सुरू होता.

यादरम्यान, गुन्हे शाखा युनिट चारचे पोलीस नाईक शंकर संपते यांना त्यांच्या खबऱ्याने माहिती दिली कि, शेख शहराच्या मध्यभागातील नरपतगिरी चौकात बनावट नोटा वटविण्यासाठी येणार आहे. यावर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी त्या ठिकाणी सापळा रचून शेख याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे २०० रुपयांच्या सात बनावट नोटा आढळून आल्या. पोलिसांनी त्या जप्त करुन शेख याला अटक केली.

ही कारवाई सहायक पोलीस आयुक्त भानुप्रताप बर्गे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अंजुम बागवान, सहायक निरीक्षक अश्विनी जगताप, शंकर पाटील, सुनील पवार, शंकर संपते, रमेश चौधर यांनी केली.