Desh

दोनपेक्षा अधिक अपत्य असल्यास सरकारी नोकरी नाही

By PCB Author

October 22, 2019

आसाम, दि. २२ (पीसीबी)-  दोनपेक्षा अधिक अपत्य असल्यास यापुढे सरकारी नोकरीला मुकावे लागणार आहे. आसाममधील भाजपा सरकारने हा निर्णय घेतला आहे. आसाममधील वाढत्या लोकसंख्येवर आळा घालण्यासाठी सरकारने हे पाऊल उचलले आहे. ज्यांना दोन पेक्षा अधिक अपत्य असतील त्यांना १ जानेवारी २०२१ नंतर सरकारी नोकरीमध्ये सामावून घेतले जाणार नाही. सोमवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर आसामच्या जनसंपर्क विभागाने या निर्णयासंबंधी माहिती दिली.

छोटे कुटुंब पद्धतीनुसार १ जानेवारी २०२१ नंतर ज्या कुटुंबांमध्ये दोन पेक्षा अधिक अपत्य असतील त्यांना सरकारी नोकरीपासून वंचित राहावे लागणार असल्याचे निर्णयात म्हटले आहे. या मंत्रिमंडळाच्या बैठकीत अन्य मुद्द्यांवरही निर्णय घेण्यात आले. या अंतर्गत जमीन धोरणही मंजुर करण्यात आले. भूमिहीन लोकांना शेतजमीन आणि घरे बांधण्यासाठीदेखील जमीन देण्याचा निर्णय घेण्यात आला.

यापूर्वी १५ ऑगस्ट रोजी लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाढत्या लोकसंख्येबाबत चिंता व्यक्त केली होती. तसेच वाढत्या लोकसंख्येला आळा घालण्यासाठी पुढील पिढीने विचार करण्याचा सल्लाही त्यांनी दिला होती. वाढती लोकसंख्या हे आपल्या देशापुढील मोठे आव्हान आहे. छोटे कुटुंब असणे हीदेखील देशभक्ती असल्याचे मत पंतप्रधानांनी बोलताना व्यक्त केले. ज्यांचे कुटुंब लहान आहे ते सन्मानाचे मानकरी आहेत. वाढत्या लोकसंख्येला आळा घालण्यासाठी जनजागृती होणे आवश्यक आहे. यासाठी सामाजिक स्तरावर जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन केले पाहिजे, असेही त्यांनी नमूद केले होते.