देहूरोड मिलीटरी कॅम्पमध्ये जवानाची स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या

0
351

देहुरोड, दि. ५ (पीसीबी) – मिलीटरी कॅम्पमधील जवानाने कामावर असताना रायफलमधून स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली. ही घटना आज (शुक्रवारी) दुपारी पावणेचारच्या सुमारास देहुरोड येथे घडली.

नरेंद्र सिंग (वय ३५, रा. मिलीटरी कॅम्प, देहूरोड) असे आत्महत्या केलेल्या जवानाचे नाव आहे. याप्रकरणी देहुरोड पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नरेंद्र सिंग हे मुळचे पंजाबचे रहवासी होते. लष्करात लान्स नायक या पदावर सध्या ते कार्यरत होते. आज (शुक्रवारी) नेहमीप्रमाणे ते कामावर आले. दुपारी पावणेचारच्या सुमारास अचानक त्यांनी स्वत:कडील रायफलमधून आपल्या गळ्यावर गोळी झाडून घेतली. गंभीर जखमी अवस्थेतील नरेंद्र यांना सहकाऱ्यांनी तातडीने रूग्णालयात नेले. मात्र, उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यु झाला. शवविच्छेदनासाठी त्यांचा मृतदेह पिंपरीतील वायसीएम रूग्णालयात नेण्यात आला. त्यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही. वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनीष कल्याणकर तपास करत आहेत.