Maharashtra

देहूचा कार्यक्रम सरकारी नव्हे खासगी असल्याने प्रोटोकॉल नव्हता – भाजपाचे स्पष्टीकरण

By PCB Author

June 15, 2022

मुंबई, दि. १५ (पीसीबी) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मंगळवारी देहूमध्ये झालेल्या कार्यक्रमावरून वाद निर्माण झाला आहे. या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे भाषण न झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसकडून भाजपवर टीका केली जात आहे. पण हा कार्यक्रम सरकारी नव्हता तर खासगी होता आणि खासगी कार्यक्रमाला प्रोटोकॉल नसतो, असं भाजपकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. वाद वाढल्यानंतर महाराष्ट्र भाजपकडून याबाबतचे स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. भाजपकडून सांगण्यात आलं आहे की, देहू येथील कार्यक्रम हा सरकारी नव्हता, तर खाजगी होता. प्रोटोकॉल हा सरकारी कार्यक्रमाला असतो, खाजगी कार्यक्रमाला नाही. शिवाय स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भाषण करण्याची विनंती केली. पण, त्यांनी नकार दिला. उपमुख्यमंत्रीच नाही तर आघाडीला डावलण्याचा ‘करेक्ट कार्यक्रम’ पंतप्रधान कार्यालयानेच केला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौर्‍यातील राजभवन येथील कार्यक्रमच सरकारी होता. तेथे प्रोटोकॉलपणे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे भाषण झाले. (येथे देवेंद्र फडणवीस यांचे भाषण झालेले नाही, हे लक्षात घ्या), असं भाजपनं नमूद केलं आहे. मुंबई समाचारचा कार्यक्रम खाजगी होता. तरीही तेथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे भाषण झाले. देवेंद्र फडणवीस यांचे भाषण झाले नाही. नरेंद्र मोदीजी यांच्या तीन कार्यक्रमांपैकी दोन कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस यांचे भाषण न होऊनही भाजपाकडून कोणताही आक्रस्ताळेपणा झालेला नाही. कारण, भाजपासाठी वारकरी, स्वातंत्र्यसेनानींचे स्मारक, एका वृत्तपत्राची द्विशताब्दी हे विषय महत्त्वाचे आहेत, स्वत:चा अहंकार नाही, असं भाजपकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

मोदींनी अजितदादांच्या खांद्यावर हात ठेवला, म्हणून राष्ट्रवादीतील काहींच्या पोटात दुखतंय… ही वस्तुस्थिती कळल्यानंतर सुद्धा ज्यांना केवळ गरळ ओकायची आहे, त्यांना महाराष्ट्राचा गौरव, महाराष्ट्राची परंपरा याच्याशी काहीएक घेणं-देणं नाही. त्यांना केवळ तळ्या उचलायच्या आहेत. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे या गरळ ओकण्यामागे मोदीद्वेष अधिक आहे. त्यामुळे त्यांना औषध नाही, अशी टीकाही भाजपनं केली आहे.