देहूगावातील कर्करोग निदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

0
573

देहू, दि. १२ (पीसीबी) – आरोग्यक्रांती प्रतिष्ठान, कर्तव्य फाऊंडेशन आणि प्राथमिक आरोग्य केंद्र देहू यांच्या संयुक्त विद्यमाने देहूगाव येथे महिलांसाठी मोफत कर्करोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात महिलांनी उत्स्फूर्त सहभाग घेत ११८ महिलांची मोफत कर्करोग तपासणी समवेदना संस्थेद्वारे करण्यात आली.

देहूगावातील प्राथमिक आरोग्य केंद्राचे मुख्य वैद्यकिय अधिकारी तथा नेत्ररोग तज्ञ डॉ. किशोर यादव म्हणाले, ’’तिशीनंतरच्या महिलांमध्ये स्तनांच्या आणि गर्भाशयाच्या कर्करोगाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. एखाद्या कुटुंबातील महिलेला कर्करोग सारखा आजार झाल्यास ते संपूर्ण कुटुंब उद्वस्त होते. तसेच या आजारावरील उपचारही महागडे असल्याने सर्वसामान्यांना उपचार करणे शक्य नसते. त्यामुळे ३० वर्षांपुढील प्रत्येक महिलेने कर्करोग होण्यापुर्वीच त्याची तपासणी करून घेतल्याल योग्य वेळी निदान झाल्यास त्वरीत उपचार होऊ शकतात. याच उद्देशाने आरोग्यक्रांती प्रतिष्ठान, कर्तव्य फाऊंडेशन व प्राथमिक आरोग्य केंद्र देहूगाव यांच्या संयुक्त विद्यमाने हे कर्करोग निदान शिबिर घेण्यात आले.’’

तपासणी झालेल्या एकूण महिलांपैकी १४ महिलांना पुढील तपासणी व उपचार समवेदना संस्थेमार्फत मोफत करण्यात येणार आहेत. उर्वरित सर्व महिलांनी कॅन्सर मुक्तीचा आनंद शिबिरातील ’सेल्फी पॉईंट’वर ’सेल्फी’ घेऊन साजरा केला. यावेळी आरोग्यक्रांती प्रतिष्ठान व कर्तव्य फाऊंडेशनचे सर्व सभासद, नारी शक्ती मंचाच्या शुभांगी काळंगे उपस्थित होत्या. तर समवेदना संस्थेच्या एकूण १२ जणांच्या टीमने महिलांची तपासणी केली.